अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांतर्गत अनेक खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये शासकीय जागेवर विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवणे, विनयभंग, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (पॉक्सो), मोटारसायकल चोरी आणि दोन विवाहित महिला त्यांच्या लहान मुलांसह बेपत्ता झाल्याच्या घटनांचा समावेश आहे.
शासकीय जागेवर विनापरवानगी पुतळे; मलकापूर परिसरात दोन गुन्हे दाखल
मलकापूर परिसरात शासकीय जागेवर पूर्वपरवानगी न घेता आणि जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत.
एमआयडीसी मलकापूर: हरसोडा जुणे येथील जुन्या मराठी प्राथमिक शाळेच्या खालील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी २ फूट उंच लोखंडी कठड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा १३ फूट उंचीचा विटकरी रंगाचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा बेकायदेशीरपणे स्थापित केला. ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद काशिराम माळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: देवधाबा येथील बस स्टँडजवळील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोकळ्या जागेतही अशाच प्रकारे १३ फूट उंचीचा काळ्या रंगाचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी बसवून अतिक्रमण करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी गजानन पंडित झनके यांच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड पुढील तपास करत आहेत.
बोराखेडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मलकापुरात महिलेचा विनयभंग व धमकी
बोराखेडी: निमखेड (ता. मोताळा) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह गोपाल राठोड याच्याशी झाला होता. दोघेही पुण्यात कामासाठी गेले असता मुलीची प्रकृती बिघडली. तिला अकोला शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता, तिने एका मुलाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने अकोला पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो बोराखेडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. पुढील तपास पोउनि राजेंद्र कपले हे करत आहेत.
मलकापूर शहर: घिर्णी येथील ३६ वर्षीय महिला घरात एकटी असताना अमोल श्रीराम वाघमारे याने घरात घुसून तिचा विनयभंग केला. महिला ओरडल्याने आरोपी पळून गेला. त्यानंतर त्याचे नातेवाईक नलूबाई वाघमारे आणि भागवत वाघमारे यांनी पीडितेला अश्लील शिवीगाळ करत “आमचा मुलगा वकील आहे, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही” अशी धमकी दिली. सरला वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील हे करत आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे आणायला गेलेल्या महिलेसह दोन जणी बेपत्ता
पिंपळगाव राजा: उमरा (ता. खामगाव) येथील रहिवासी असलेली २७ वर्षीय महिला २० जून रोजी सकाळी “लाडकी बहीण योजनेचे पैसे आणण्यासाठी पिंपळगाव राजा येथे जाते” असे सांगून घरून निघाली, ती अद्याप परतलेली नाही. तिचा फोनही बंद आहे. पतीने नातेवाईकांकडे शोध घेऊन अखेर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास गायकवाड करीत आहेत.
शेगाव शहर: रोकडिया नगर येथील २५ वर्षीय महिला आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी या ३० जून रोजी घरी कोणालाही न सांगता निघून गेल्या. पती दत्तात्रय तायडे शेतात पेरणीसाठी गेले असता ही घटना घडली. याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार निलेश गाडगे करत आहेत.
मोटारसायकल चोरी आणि विषप्राशनामुळे वृद्धाचा मृत्यू
मलकापूर शहर: कुलमखेड येथील रहिवासी गणेशराव सोपानराव पाटील यांच्या घरासमोरून त्यांची १० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-एव्ही-९३९७ अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास लंपास केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रिजवान करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: विवरा येथील भीमराव शेषराव पाटील यांनी १३ जून रोजी अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले होते. मलकापूर आणि नंतर बुलढाणा येथील मेहेत्रे रुग्णालयात उपचार सुरू असताना १७ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. रणगाव शिवार हे घटनास्थळ मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने, कागदपत्रांची पडताळणी करून अकस्मात मृत्यू नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुभाष सरकाटे हे करत आहेत.
