अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, गेल्या २४ तासांत शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा आणि तामगाव या परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, दुचाकी चोरी आणि विनापरवाना पुतळा बसवल्याच्या घटनांचा समावेश आहे.
शेगाव: खोटी माहिती देऊन लग्न आणि फसवणूक; उत्तर प्रदेशातील आरोपींवर गुन्हा
शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी कांचन रघुनाथ सिंग ठाकूर (वय ४९ वर्षे) रा. गीतेचा मळा, शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राकेश कुमार महेंद्र प्रताप सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांनी (रा. बदलापूर, उत्तर प्रदेश) लग्नासाठी खोटी माहिती देऊन फिर्यादीची आणि सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक केली. २०१५ ते २०२४ या काळात फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरून याप्रकरणी बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी गजानन सोनटक्के तपास करत आहेत.
जळगाव जामोद व सोनाळा: किरकोळ वादातून हाणामारी; महिलांना मारहाण
जळगाव जामोद: हजी नगर भागात किरकोळ वादातून फिर्यादी आरेफाबी शेख रईस आणि त्यांच्या मुलाला आरोपी शेख हबीब, शेख अस्लम आणि शेख मबु यांनी काठ्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सपोनी नागेश मोहोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सोनाळा: सोनाळा येथे नणंदेला दगड फेकून मारल्याच्या आणि फिर्यादी सौ. वर्षा गणेश सोळंके यांना त्यांच्या सासूने केस धरून पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रकाश शिंदे, राजेश शिंदे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार रमेश खरात तपास करत आहेत.
नांदुरा: विनापरवाना पुतळे बसवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हे
नांदुरा परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना सार्वजनिक जागेवर पुतळे बसवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. चांदूरबिस्वा येथील गांधी चौकातील ग्रामपंचायतीच्या जागेवर कोणत्याही परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी गजानन बहुरुपे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तर नायगाव येथील चावडीच्या जागेवरही अशाच प्रकारे अनधिकृतपणे पुतळा बसवल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी अनुप वानखडे यांनी तक्रार दिली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
रायपुर (सैलानी): दर्शनासाठी आलेल्या भाविकाची दुचाकी लंपास
संभाजी नगर येथील रहिवासी रवींद्र कौतीक बनकर हे सैलानी येथे नवसाच्या कार्यक्रमासाठी आले असता, पोलीस चौकीच्या पाठीमागे लावलेली त्यांची ‘एच एफ डिलक्स’ मोटारसायकल क्रमांक एमएच-२०-डीएल- ४७७८ अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी रायपुर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तामगाव: शेतात बकऱ्या चारल्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला
तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वस्तगाव शेतशिवारात एक गंभीर घटना घडली. फिर्यादी बापुना बाबन शेजोळे यांनी त्यांच्या शेतात कांदे असल्याने बकऱ्या चारण्यास मज्जाव केला. याचा राग येऊन आरोपी गजानन वानखडे याने बापुना यांच्या पायावर आणि हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
