अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्हेगारी घटना आणि हरवल्याच्या प्रकरणांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. मलकापूर ग्रामीण हद्दीत शेतजमिनीच्या वादातून मारहाण व दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे, तर शेगाव, जळगाव जामोद आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शेतजमिनीच्या वादातून मारहाण
मलकापूर ग्रामीण: खडकी (ता. मलकापूर) शेत शिवारातील गट क्र. १७ मध्ये शेताच्या ताब्यावरून दोन गटांत वाद झाला. फिर्यादी महिला शेतात काम करत असताना आरोपींनी “हे शेत आमचे आहे” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. एका आरोपीने विळ्याने वार करून महिलेच्या डाव्या हाताच्या बोटावर दुखापत केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या मुलींनाही मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्या मुलीचा मोबाईल दगडावर आदळून सुमारे ७ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३२४(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
घरासमोर उभी असलेली दुचाकी जाळली
मलकापूर ग्रामीण: वरखेड (ता. मलकापूर) येथे फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी अज्ञात इसमाने जाळली. या आगीत दुचाकीचे मागील बाजूने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (एफ) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
शेगाव शहर: ट्यूशन क्लासला जाते असे सांगून घरातून निघालेली २३ वर्षीय तरुणी घरी परतली नाही. तिचा मोबाईल बंद येत असून नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. पोलीस ठाण्यात ‘कायमी मिसिंग’ नोंदवण्यात आली आहे.
जळगाव जामोद: पिंपरी खोद्री येथून १८ वर्षीय तरुणी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे. परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती न आढळल्याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झाली आहे.
बुलढाणा शहर: अभ्यासिकेत जाण्यासाठी घरून निघालेली १९ वर्षीय तरुणी सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. ऑटोचालकाने तिला अभ्यासिकेजवळ सोडल्याचे सांगितले, परंतु ती तेथे पोहोचली नव्हती. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत मिसिंगची नोंद झाली असून पोलीस शोध घेत आहेत.
