अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गेल्या २४ ते ४८ तास अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक ठरले आहेत. दसरखेड, नांदूरा आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे, दारूच्या नशेत तरुणाला बेदम मारहाण, वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या आमसभेत शासकीय अधिकारी आणि पत्रकारांमधील वाद, हायवेवरील भीषण जीवघेणा अपघात आणि वृद्ध दांपत्याला भररस्त्यात लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशन दसरखेड: हुंड्यासाठी विवाहितेची आत्महत्या आणि दारूच्या नशेत मारहाण
दसरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या गंभीर घटनांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत सासरच्या जाचाला कंटाळून सरिता पाटील यांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी वैभव पाटील यांची बहीण सरिता हिचा विवाह विवरा येथील धनराज पाटील याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरचे लोक तिला माहेरवरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून नेहमी मारझोड, शिवीगाळ करून त्रास देत होते व जिवाने मारण्याची धमकी देत होते. या सततच्या छळाला कंटाळून सरिता पाटील हिने २८ मे रोजी दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास विवरा येथील विहिरीत उडी घेतली, त्यामुळे पाण्यात बुडून तिचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी दसरखेड पोलिसांनी वैभव जानकिराम पाटील (वय २२ वर्षे) रा. सूरवाडा (ता.बोदवड) याच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक शामराव पाटील (सासरा), इंद्रायणीबाई अशोक पाटील (सासू), राजेश अशोक पाटील (दीर), धनराज अशोक पाटील (पती) (सर्व रा. विवरा, ता. मलकापूर), अक्काबाई निलेश पाटील (ननंद, रा. ढालसिंगी, ता. जामनेर) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ८०, ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वारे हे करीत आहेत.
नरवेल देशी दारू दुकानाजवळ तरुणाला लाकडी बल्लीने मारहाण
नरवेल गावच्या देशी दारू दुकानाजवळ एका तरुणाला दारूच्या नशेत जुन्या वादावरून कॉलर पकडून लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली.
२८ मे रोजी रात्री ११ वाजता अभिषेक सुनील कापसे (वय २८ वर्षे) रा. धरणगाव ता. मलकापूर हा म्हैसवाडी येथून धरणगाव येथे जात असताना नरवेल देशी दारू दुकानाजवळ रस्त्यात भांडण व गर्दी दिसली. त्यामुळे फिर्यादीने गाडीचा वेग कमी केला. तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या सौरभ राजपूतने विनाकारण फिर्यादीची कॉलर पकडली. कॉलर सोडायला सांगितली असता, तेथे पंकज, नागेश व विष्णू कोलते आले. त्यांनीही दारूच्या नशेत शिवीगाळ केली. फिर्यादी तिथून निघून जात असताना सर्व आरोपींनी संगनमत करून लाकडी बल्लीने अभिषेकच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभ राजपूत (रा. मलकापूर), पंकज कोलते, नागेश कोलते, विष्णू कोलते (सर्व रा. नरवेल, ता. मलकापूर) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे हे करीत आहेत.
पोलीस स्टेशन नांदूरा: वडनेर भोलजी ग्रामपंचायतीच्या आमसभेत राडा; दोन्ही बाजूने गुन्हे दाखल
नांदूरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आयोजित ग्रामपंचायतीच्या वार्षिक आमसभेत शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ-पत्रकारांमध्ये तीव्र संघर्ष झाला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
२९ मे रोजी दुपारी १२.१५ वाजता ग्रामपंचायत कार्यालय वडनेर भोलजी येथे वर्ष २०२६-२७ ची पहिली सर्वसाधारण आमसभा पोलीस बंदोबस्तात सुरू होती. सभा सुरळीत चालू असताना अंतिम भागात गावातील आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जाणीवपूर्वक गोंधळ, आरडाओरडा करून प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. जमावापासून वाचण्यासाठी फिर्यादी बाहेर पडत असताना आरोपी उमा बोचरे व इतरांनी शासकीय रजिस्टर व फाईल्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी महिला सदस्यांना घेरून धक्काबुक्की केली, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी ग्रामपंचायत प्रशासक सुनिता सातव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राम शिवाजी बोराळे, राधेश्याम ज्ञानेश्वर सातव, शांताराम बेलाकार, योगेश मनोहर इंगळे, शालीग्राम तोताराम जुमडे, आशुतोष संतोष लेइंग, अजय बाबुराव लोखंडे, अन्सार शेख, फिरोज खान, एजाज खाँ, उमा बोचरे व इतर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १३१, २९६, २२१, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पत्रकार उमा गोपाल बोचरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आमसभा सुरू असताना पत्रकार उमा बोचरे व इतर ग्रामस्थ तेथे हजर होते. ते ‘जल जीवन मिशन’च्या पाईपलाईनबाबत माहिती व प्रश्न विचारत होते. मात्र, उत्तर न देता अचानक चिडून जाऊन आरोपी सुनिता सातव यांनी भरसभेत महिला पत्रकाराला अत्यंत गलिच्छ व अश्लील भाषेचा वापर करून अपमानित केले. तसेच तेथे हजर असलेल्या आरोपी रविंद्र हरीभाऊ सातव, देविदास वाघ, शेख करीम, ओम संतोष दिघे, संदिप बोचरे, संतोष दिघे आणि ऋषीकेश देशमुख यांनी देखील फिर्यादीला शिवीगाळ केली आणि “तुला एखाद्या दिवशी मोठ्या कांडात अडकवून टाकू” अशी धमकी दिली. मध्यस्थी करायला आलेल्या ग्रामस्थांनाही आरोपींनी लोटपाट करून जीवाने मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), २९६, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन मलकापूर शहर: हायवेवर कारचा भीषण अपघात आणि वृद्ध दांपत्याची लूट
मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनर चालकाच्या बेजबाबदार ब्रेकमुळे नॅशनल हायवे क्र. ५३ वर उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी स्विफ्ट डिझायर कार कंटेनरला धडकली. या प्रकरणी ऋषिकेश अशोक राव किंदले (वय २९ वर्षे) यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार चंद्रकांत शिंदे करत आहेत.
स्कुटरवरून जाणाऱ्या वृद्ध महिलेचे ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबवले
मलकापूर शहरात बाईकस्वार चोरट्यांनी एका ७५ वर्षांच्या वृद्धाच्या डोळ्यादेखत त्याच्या पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला आहे.
२९ मे रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी सरलाबाई खंडेलवाल हे विष्णूवाडी येथे एका कार्यक्रमावरून स्कुटरने साईनगरकडे जात होते. साईनगर बोर्डाच्या थोडे पुढे गेले असता, विरुद्ध दिशेने एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी आपली बाईक संथ केली आणि मागे बसलेल्या चोराने सरलाबाई यांच्या गळ्यातील जुने वापरते २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र (किंमत अंदाजे ८० हजार रुपये) जबरदस्तीने ओढून तोडले व मोटारसायकलवर पळून गेले.
याप्रकरणी विजयकुमार श्रीकृष्ण खंडेलवाल (वय ७५ वर्षे) रा. साईनगर, मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनी शुभम बरदाडे हे करत आहेत.
