पत्नीचा साडीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): घरगुती वादातून आपल्या २५ वर्षीय पत्नीचा साडीने गळा आवळून खून करणाऱ्या देऊळगाव राजा येथील आरोपी पती सुनील भास्कर गीते याला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे. तसेच कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शिवकन्या सुनील गीते (वय २५) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी शिवकन्या ही पती, सासू आणि सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपला आठ वर्षांचा मुलगा प्रतीक याच्यासह माहेरी राहात होती. तिने यापूर्वी पोलिसांत त्रासाबाबत तक्रारीही केल्या होत्या. मात्र, घटनेच्या १५ दिवस आधी मध्यस्थांमार्फत त्यांच्यात तडजोड झाली आणि शिवकन्या मुलासह सासरी नांदायला आली. नंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच, म्हणजेच ३ एप्रिल २०२३ रोजी राहत्या घरी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान आरोपी सुनील गीते याने शिवकन्याचा साडीने गळा आवळून खून केला.

घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या कल्पना बोधने यांनी शिवकन्याला बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहून कृत्रिम श्वास देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेजारी राहुल कायंदे यांच्या गाडीने तिला देऊळगाव राजा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

सुरुवातीला या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी केलेल्या इनक्वेस्ट पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालावरून शिवकन्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्यानुसार पीएसआय खाडे यांनी ६ एप्रिल २०२३ रोजी आरोपी सुनील गितेविरुद्ध रीतसर तक्रार दिली. यावरून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान सासरच्या त्रास समोर आल्याने यात भादंवि कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ ची वाढ करण्यात आली. सखोल तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

हा खटला बुलडाणा सत्र न्यायालयात चालवण्यात आला. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक साक्ष मयत शिवकन्याचा आठ वर्षांचा मुलगा प्रतीक सुनील गिते याची ठरली, जो या घटनेचा प्रत्यक्षदर्शी होता. तसेच शेजारी कल्पना बोधने, राहुल कायंदे, मृतकचे वडील अशोक सोनुने, भाऊ पवन सोनुने, मध्यस्थ उद्धव घुगे, पंच साक्षीदार योगिता सोनुने, पंढरीनाथ नागरे, अजितसिंग बावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा अवचार, डॉ. शाहीन आसमा आणि तपास अधिकारी हेमंत शिंदे, जीवन सोनोवणे व किरण खाडे यांच्या साक्षी एकमेकांशी सुसंगत व महत्त्वाच्या ठरल्या.

बचाव पक्षाचा दावा होता की शिवकन्याने आत्महत्या केली आहे, तर सरकारी पक्षाने हा गळा आवळून केलेला खून असल्याचे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून सिद्ध केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी आरोपी सुनील गिते याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या एकूण रकमेपैकी आठ हजार रुपयांची रक्कम बालसाक्षीदार प्रतीक याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

सासऱ्याचा मृत्यू, सासू निर्दोष

दरम्यानच्या काळात, आरोपी सासरे भास्कर गिते यांचा मृत्यू झाला, तर आरोपी सासू चंद्रभागाबाई गिते यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

सरकारी पक्षाचा जोरदार युक्तीवाद

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी अत्यंत भक्कमपणे बाजू मांडली. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुनील साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर बचाव पक्षातर्फे आरोपीतर्फे मुख्य विधी सेवा बचाव पक्षाकडून वकील ॲड. पी. आर. सानप यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!