मलकापूरात थरार! रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाला लुटले; फायटरने हल्ला करत जीवे मारण्याची धमकी

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील ऑटो स्टॉपजवळ एका तरुणाला अडवून त्याला अंधारात ओढत नेत जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत फिर्यादीचा मोबाईल आणि १० हजार रुपयांची रोकड लंपास झाली असून, आरोपींनी ‘फायटर’ सारख्या हत्याराने चेहऱ्यावर वार करून तरुणाला गंभीर जखमी केले आहे.

शहरातील गणपती नगर परिसरात राहणारे कृष्णा सुरेश काचकुटे (वय २८ वर्षे) हे खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. १४ एप्रिल २०२६ च्या रात्री १ वाजेच्या सुमारास ते अहिल्यानगरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे पायी जात होते. रेल्वे स्टेशनजवळील ऑटो स्टॉप परिसरात पोहोचले असता, आरोपी गौरव दहीभाते आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी मित्राने कृष्णा यांना गाठले.

आरोपींनी कृष्णा यांच्या पाठीवरील लॅपटॉपची बॅग ओढून त्यांना बळजबरीने अंधाराच्या दिशेला नेले. कृष्णा यांनी याला विरोध केला असता, त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत कृष्णा यांचा ‘वन प्लस’ कंपनीचा मोबाईल आणि खिशातील १० हजार रुपये रोख गहाळ झाले आहेत. तसेच आरोपी गौरव दहीभाते याने ‘फायटर’ सदृश्य वस्तूने कृष्णा यांच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी कृष्णा काचकुटे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ३५२, ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार निबोळकर हे करीत आहेत. रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या भागात रात्रीच्या वेळी अशा प्रकारची लूटमार आणि जीवघेणा हल्ला झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!