मलकापूर: दारूच्या नशेत तरुणाला लाकडी बल्लीने बेदम मारहाण; चौघांवर दसरखेड पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील देशी दारू दुकानाजवळ एका २८ वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत चौघांनी संगनमत करून लाकडी बल्लीने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दसरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक सुनील कापसे (वय २८ वर्षे), रा.धरणगाव, ता. मलकापूर हे २८ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास म्हैसवाडी येथून धरणगाव येथे जात होते. नरवेल ग्रामपंचायत हद्दीतील देशी दारूच्या दुकानाजवळ रस्त्यावर त्यांना भांडण आणि लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे अभिषेक यांनी आपल्या वाहनाचा वेग कमी केला. त्याच वेळी तेथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या सौरभ राजपूत याने काहीही कारण नसताना अभिषेक यांची कॉलर पकडली. अभिषेक यांनी “माझी कॉलर सोड” असे म्हटले असता, तेथे उपस्थित असलेले पंकज कोलते, नागेश कोलते आणि विष्णू कोलते हे देखील दारूच्या नशेत तिथे आले आणि त्यांनी अभिषेक यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अभिषेक मारहाण व वाद टाळण्यासाठी तेथून निघून जात असताना, चारही आरोपींनी संगनमत करून लाकडी बल्लीने अभिषेक यांच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर जबर प्रहार केले. या हल्ल्यात अभिषेक यांना मुक्का मार लागून ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर मोठी सूज आली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी अभिषेक कापसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ राजपूत (रा.मलकापूर), पंकज कोलते (रा. नरवेल), नागेश कोलते (रा. नरवेल), विष्णू कोलते (रा. नरवेल) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!