अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. “तू माझ्या पत्नीसोबत का बोलतो?” असा जाब विचारल्याचा राग मनात धरून दोन भावांनी एका ३६ वर्षीय मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले, तर दुसऱ्या आरोपीने गळा आवळून नखांनी जखमा केल्या प्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद अशरफ मोहम्मद रफीक शेख (वय ३६ वर्षे, व्यवसाय- मजुरी), हे मूळचे ठाणे (वागळे इस्टेट, अशोक पाटील चाळ) येथील रहिवासी असून सध्या सैलानी (ता. जि. बुलढाणा) येथे राहतात. ३० मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ते आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन सैलानी येथील ‘सागर गेस्ट हाऊस’ समोरील रस्त्यावरून जात होते. त्याच वेळी सैलानी येथे राहणारा बल्ली आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघेही तिथून जात असताना फिर्यादी मोहम्मद अशरफ यांनी बल्लीला थांबवले. अशरफ यांनी बल्लीला विचारले, “तू माझ्या पत्नीसोबत का बोलतोस?”, या साध्या प्रश्नावर बल्लीचा पारा चढला. त्याने अत्यंत उद्धटपणे, “तुला काय करायचे आहे? तू तुझ्या पत्नीला समजून सांग, मला सांगू नको,” असे उत्तर दिले.अशरफ यांनी त्याला पुन्हा बजावले की, “तू माझ्या पत्नीशी बोलणे सोडून दे.”, यावरून संतापलेल्या बल्लीने अशरफ यांना भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करत आरोपी बल्ली आणि त्याचा मोठा भाऊ या दोघांनी मिळून मोहम्मद अशरफ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, आरोपी बल्लीने स्वतःच्या हातातील धातूच्या कड्याने अशरफ यांच्या डोक्यावर जोरदार वार केल्याने ते जखमी झाले. त्याच वेळी बल्लीच्या मोठ्या भावाने अशरफ यांची गचांडी घट्ट पकडली. झटापटीदरम्यान आरोपीच्या हाताची नखे लागल्याने अशरफ यांच्या गळ्यावर गंभीर ओरखडे आणि जखमा झाल्या. हा राडा एवढ्यावरच थांबला नाही, तर दोन्ही आरोपींनी फिर्यादीला भररस्त्यात “तुला जीवे मारून टाकू”, अशी थेट धमकी दिली. आरडाओरड ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या काही अज्ञात नागरिकांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले. नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे फिर्यादी अशरफ यांचे प्राण वाचले. नागरिकांनी भांडण सोडवल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी मोहम्मद अशरफ यांनी रायपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास खार्डे हे करीत आहेत.
