लोखंडी पाइप व बेल्टने युवकाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील नवीन ईदगाह गणवाडी रोड परिसरातील गुलशन प्लॉट येथे जुन्या वादाच्या कारणावरून १७ वर्षीय युवकाला लोखंडी पाइप, बेल्ट तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मुसद्दीक अकल शेख राईस बागवान (वय १७, रा. ताज नगर पारपेठ, मलकापूर) याला आरोपींनी “तुझ्याशी बोलायचे आहे” असे सांगून सोबत नेले. त्यानंतर मागील मोटारसायकल धक्क्याच्या वादाच्या कारणावरून आरोपी शेख अकील शेख कलीम पटेल, शेख शकील शेख कलीम व सरफराज उर्फ जोकर शेख आरीफ (सर्व रा. पारपेठ, मलकापूर) यांनी त्याला मारहाण केली. यामध्ये आरोपी शेख अकील याने फिर्यादीस लोखंडी पाइपने मारहाण केली, तर शेख शकील याने कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच सरफराज उर्फ जोकर याने चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी “पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवे मारून टाकू” अशी धमकीदेखील आरोपींकडून देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे कायमी गुन्हा क्रमांक 398/2026 अन्वये कलम 118(1), 115(2), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेड पोउपनि सुरेश रोकडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!