शेगावच्या महसूल पथकावर रेती माफियांचा सर्जिकल स्ट्राईक! जप्त केलेली ४ लाखांची ‘पूर्णा माय’ बोट पळवली; जलंब पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात रेती माफियांची मुजोरी आता शिगेला पोहोचली आहे. भास्तन शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटीवर महसूल विभागाने धाड टाकून ती जप्त केली, मात्र प्रशासकीय यंत्रणा हलण्यापूर्वीच अज्ञात ३ ते ४ इसमांनी थेट शासकीय ताब्यातून ही बोट पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जलंब पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रेती माफियांनी थेट प्रशासनालाच दिलेले हे उघड आव्हान मानले जात आहे.

शेगाव तहसील कार्यालयाला भास्तन शिवारामधील पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत ग्राम अधिकारी तुळशिदास विठ्ठल वानखेडे (वय ५३ वर्षे) आणि त्यांच्या पथकाने ५ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.५० वाजेच्या सुमारास नदी पात्रात छापा टाकला. या कारवाईदरम्यान, ‘पूर्णा माय’ असे पांढऱ्या अक्षरात नाव असलेली आणि इंग्रजीमध्ये ‘Shubham Pump’ लिहिलेली अंदाजे ४ लाख रुपये किमतीची जुनी बोट अवैध रेती उपसा करताना आढळून आली. महसूल पथकाने तत्परता दाखवत ही बोट नदी पात्रातून ओढून किनाऱ्यावर आणली आणि तिचा रीतसर पंचनामा केला. या प्रकरणी ग्राम अधिकारी तुळशिदास वानखेडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून जलंब पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपद ग्रेड पोलीस उपनिरीक्षक देव करीत आहेत.

अंधाराचा फायदा आणि फिल्मी स्टाईल चोरी

जप्त केलेली बोट हलवण्यासाठी जेसीबी आणि इतर साहित्याची प्रतीक्षा महसूल अधिकारी करत होते. तोपर्यंत ही बोट फिर्यादी तुळशिदास वानखेडे आणि मंडळ अधिकारी पालकर यांच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या गडद अंधाराचा आणि निर्जन स्थळाचा फायदा घेत ३ ते ४ अज्ञात इसमांनी धाडस दाखवत महसूल विभागाच्या ताब्यात असलेली ती बोट पुन्हा नदी पात्रातून चोरून नेली. शासकीय कामात अडथळा आणून चक्क जप्त केलेला माल पळवून नेल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मगर नाल्यात सापडली बोट!

बोट चोरीला गेल्याचे लक्षात येताच महसूल विभागाने शोधमोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी दुपारी २:५० वाजेच्या सुमारास ही बोट मगर नाला, भेंडवळ येथे नदी पात्रात सोडून दिलेली आढळून आली. चोरी करून ती सुरक्षित स्थळी नेण्याचा किंवा पुरावा नष्ट करण्याचा हा माफियांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशासनाचा वचक संपला का?

एकीकडे सरकार अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध कठोर पावले उचलत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे अधिकारी समोर उभे असताना जप्त केलेली मालमत्ता चोरून नेली जाते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. रेती माफियांना कोणाचे अभय लाभत आहे? मध्यरात्रीच्या वेळी अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत ४ लाखांची बोट पळवून नेण्यापर्यंत माफियांची हिंमत वाढलीच कशी? हा प्रश्न आता शेगाव तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. आता जलंब पोलीस या ३ ते ४ अज्ञात गुंडांच्या मुसक्या कधी आवळणार हे याकडे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!