धाड पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध रेतीचा ट्रक जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; खाकीच्या आशिर्वादाने वाळू माफियांचा नंगानाच?

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असून वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. जांब (ता.बुलढाणा) येथून अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या एका ट्रकला स्थानिक गुन्हे शाखेने म्हसला खुर्द शिवारात फिल्मी स्टाईलने पकडले. एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईने धाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तुमच्या हद्दीत जे एलसीबीला दिसते, ते तुम्हाला का दिसत नाही?, असा संतप्त सवाल आता कायदेप्रिय नागरिक विचारू लागले आहेत.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांचे पथक धाड परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना जांब बाजूकडून धाडच्या दिशेने एक संशयास्पद टाटा ट्रक (क्रमांक एपी-३९-पी-६०९६) येताना दिसला. म्हसला खुर्द शिवारात सापळा रचून पोलिसांनी हे वाहन अडवले. ट्रकची झडती घेतली असता, त्यात अवैधरित्या उपसा केलेली पाच ब्रास रेती मिळून आली. याबाबत चालक अलीम खान सलीम खान (वय ३६ वर्षे) रा.ढालसावंगी याला रॉयल्टी किंवा अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यामुळे एलसीबीने वाहन आणि रेती, असा मुद्देमाल जप्त करून तो धाड पोलिसांच्या हवाली केला.
याप्रकरणी धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि गौण खनिज अधिनियमाच्या कलम २१(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार राजू टेकाळे, अनुप मेहेर, विजय वारुळे आणि चालक पोलीस अंमलदार निवृत्ती पुंड यांनी केली. एलसीबीने रेतीचा ट्रक पकडून धाड पोलिसांच्या प्रतिमेला चिखल फासला आहे. आता पोलीस अधीक्षक या ‘ढिम्म’ प्रशासनावर काय चाबूक ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाळू माफियांचा ‘नंगानाच’ आणि खाकीचे ‘मौन’
बुलढाणा जिल्ह्यात सध्या गौण खनिजाची लूट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाही महसूल आणि पोलीस प्रशासन डोळे मिटून बसल्याचे दिसते. ‘हप्तेखोरी’च्या संस्कृतीमुळेच वाळू माफियांचे धाडस वाढले असून, त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही. धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून, गुन्हेगारांना पोलिसांचा डर राहिला नाही की काय, अशी शंका या कारवाईनंतर बळावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!