अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे सध्या काही विकृत प्रवृत्तींचा छंद बनत चालला आहे. मात्र, अशा समाजकंटकांना चाप बसवण्यासाठी शेगाव ग्रामीण पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. शेगाव तालुक्यातील कालखेड फाटा परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका इसमाविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर एक तक्रार प्राप्त झाली होती. या कॉलची दखल घेत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार उमेश तुळशीराम आखरे (वय ४९ वर्षे) हे आपल्या पोलीस ताफ्यासह तातडीने कालखेड फाटा येथे पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना असे दिसून आले की, आरोपी आकाश राजेंद्र खंडेराव (वय २८ वर्षे) रा. कालखेड हा प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता. तो रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करत होता आणि मोठ्या आवाजात आरडाओरड करून परिसरात दहशत निर्माण करत होता. दारूच्या नशेत त्याला साधे उभे राहणेही कठीण झाले होते; तो वारंवार झोकांड्या खात होता आणि त्याचे वर्तन अत्यंत असभ्य होते.
आरोपीचे हे वर्तन पाहून पोलिसांनी त्वरित पंचांना पाचारण केले. पंचासमक्ष आरोपीच्या हालचालींची नोंद करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
फिर्यादी पोलीस अंमलदार उमेश आखरे यांच्या लेखी रिपोर्टवरून आणि प्राप्त झालेल्या मेडिकल सर्टिफिकेटवरून, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल आगलावे हे करीत आहेत. या कारवाईमुळे कालखेड फाटा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
