सोनाळा पोलिसांची बावनबीरमध्ये मोठी कारवाई; गोवंश कत्तलप्रकरणी एकाला अटक, १० हजारांचा मुद्देमाल जप्त

अजय टप
सोनाळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही छुप्या पद्धतीने कत्तल करणाऱ्यांविरुद्ध सोनाळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे एका घरामध्ये अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी मांस, कातडी आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोनाळा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, बावनबीर येथील एका घरात अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल केली जात असून त्याचे मांस विक्रीच्या तयारीत आहे. माहिती मिळताच ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने पंचांसह घटनास्थळी धाड टाकण्याचे नियोजन केले. पोलिसांनी दुपारी ११.३० ते १२.१५ वाजेच्या सुमारास बावनबीर येथील आरोपी शेख नईम शेख रहीम (वय ४५ वर्षे) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरामध्ये गोवंश जातीच्या जनावराची कत्तल झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ४२ किलो गोवंश मांस  (किंमत ८ हजार ४०० रुपये), दोन लोखंडी सुरे (किंमत ४०० रुपये), एक लोखंडी कुऱ्हाड (किंमत २०० रुपये), नायलॉन दोरी (लांबी ८ फूट), गोवंश चामडी (किंमत १ हजार रुपये), असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार कैलास सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नईम विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३२५ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) आणि ९ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मांसाचे नमुने रासायनिक परीक्षणाकरिता राखून ठेवले आहेत. उर्वरित कातडीची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजय पवार हे करत आहेत. भरवस्तीत सुरू असलेल्या या अवैध प्रकारामुळे बावनबीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन आणि प्राणी प्रेमींनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!