हुंड्यासाठी छळ आणि जीवे मारण्याची धमकी; पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध ‘धाड’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अभिनय बोर्डे

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “तू दिसायला सुंदर नाहीस” असे टोमणे मारत फिर्यादीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी कृष्णा वाघमारे (वय २५ वर्षे) रा. वडगाव कोल्हाटी (ता.जि.छत्रपती संभाजीनगर, ह.मु. चांडोळ, ता. जि. बुलढाणा) यांचा विवाह कृष्णा नानासाहेब वाघमारे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखात गेल्यानंतर, सासरच्या मंडळींनी शुभांगी यांच्याकडे माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा सुरू केला. केवळ पैशांची मागणीच नव्हे, तर “तू दिसायला सुंदर नाहीस” असे हिणवून तिचा वारंवार अपमान केला जात असे. ४ एप्रिल २०२५ आणि त्यापूर्वीच्या काळात वडगाव कोल्हाटी येथे संशयित आरोपींनी संगनमत करून शुभांगी यांना शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गंभीर म्हणजे जीवे मारण्याची धमकीही दिली.

सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगी वाघमारे यांनी माहेरी (चांडोळ, जि. बुलढाणा) आश्रय घेतला. या प्रकरणाची तक्रार सुरुवातीला महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष, बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली होती. तिथे दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर पीडितेने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून आणि कक्षाच्या संदर्भीय पत्रानुसार ७ मे २०२६ रोजी धाड पोलिसांनी आरोपी कृष्णा नानासाहेब वाघमारे (पती), सुलोचना नानासाहेब वाघमारे (सासू), समाधान वाघमारे (चुलत दीर), मुक्ता कैलास बारहाते (नणंद, रा. माहोरा), विटा दीपक अवसारे (नणंद, रा. सोनगाव), सीमा सचिन राऊत (नणंद, रा. लासूर) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३(५), ३५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!