क्राईम जगत
बुलढाण्यात साखळी हल्ल्याचा थरार! किरकोळ धक्क्यावरून मुलासमोरच पित्याला मारहाण
टिपू सुलतान चौक परिसरातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा, (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झली आहे. दरम्यान, शहरातील टीपू सुलतान चौक परिसरात लहान मुलांच्या खेळण्यावरून किरकोळ वाद व त्याचे रुपांतर रक्तरंजित हाणामारीत झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. बापाच्या बचावासाठी जाणाऱ्या मुलासमोरच त्याच्या पित्यावर लोखंडी साखळीने अमानुष हल्ला करण्यात आला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या समीना परविन शेख रफिक (वय ३८ वर्षे) यांचा मुलगा शेख मुजम्मील हा गल्लीतीलच मित्र शेख मन्सूर याच्यासोबत खेळत होता. खेळादरम्यान त्यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे थट्टा-मस्करी सुरू होती. त्यावेळी शम्मी परवीन नावाच्या महिलेला या मुलांचा चुकून धक्का लागला. त्यामुळे शेख आबीद शेख रफिक याने मुजम्मीलला पकडून मारहाण केली. मुलाला विनाकारण मारहाण सुरु असल्याचे बघून समीना परविन आणि त्यांचे पती शेख रफिक धावत घटनास्थळावर गेले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी शेख आबीद याने त्याच्या हातात असलेल्या साखळीने शेख रफिक यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात रफिक यांच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर गंभीर जखमा झाल्या. तसेच शेख आबीदचा साथीदार शेख अहमद शेख अशदानी यानेही समीना परविन यांना लोटपाट करुन शेख रफिक व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काहीवेळानंतर शकीलाबाजी नावाच्या महिलेने मध्यस्थी करत सदर भांडण सोडवले. पीडित कुटुंबाने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले. मात्र, त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
उपचारानंतर समीना परविन यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शेख आबीद शेख रफिक आणि शेख अहमद शेख अशदानी, दोघेही रा. टीपू सुलतान चौक (बुलढाणा) यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील ह्या करत आहेत.



