स्मार्ट बुलढाणा
नियमांची पायमल्ली: सेवानिवृत्तीनंतरही सुटेना “खुर्ची”चा मोह!
मलकापूर बाजार समितीतील "सुत्रधारा"च्या कारभारावर संताप

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूरनगरीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या नियमांची अक्षरशः थट्टा सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सेवानिवृत्त होऊनही सचिव पदावर ठाण मांडून बसलेल्या एका अधिकाऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून “सेवानिवृत्ती केवळ कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चेत आहे. कुठलीही निविदा प्रसिद्ध न करता भंगार साहित्याची विक्री करण्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, आता पुन्हा एकदा कायदे आणि सेवा अटी धाब्यावर बसवून एकाच अधिकाऱ्याला वारंवार सचिव पदावर मुदतवाढ किंवा फेरनियुक्ती देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर नियुक्ती कोणाच्या सांगण्यावरून दिली गेली?, हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे, परराज्यातून येऊन महाराष्ट्रात स्थिरावलेल्या या “सुत्रधारा”ने आपल्या संपूर्ण कुटुंबाला विविध पदांवर सामावून घेतल्याची चर्चा चांगलीच रंगली असून यामागे नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.
बाजार समितीच्या आवारात आग विझवण्यासाठी अग्निशामक गाडी असून या गाडीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या गाडीचा कधी वापर झाल्याचे उदाहरण आमच्या तरी स्मरणात नाही, असे नागरिक बोलत असून ही गाडी नक्की कोणाच्या सोयीसाठी आणि कुठे वापरली जाते?, याचे उत्तर देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे.
सहकार विभागाचे दुर्लक्ष
बाजार समितीत सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाकडे आजवर सहकार विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे. आता नव्याने उघडकीस आलेल्या या प्रकारावर आता सहकार विभाग आणि वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जोर धरत आहे.



