क्राईम जगत

दाताळ्यात दहशत! पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर प्राणघातक हल्ला

मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल; पोलीस फरार आरोपींच्या मागावर

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): जुन्या वादातून पिता-पुत्रावर आरोपींनी लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दाताळा येथील इंदिरा नगर परिसरात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाताळा (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले इरफान शहा सुभानशहा (वय ३५ वर्षे) हे २३ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता दरम्यान आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी यातील आरोपी मुस्तकीन शहा मुनीर शहा याने नफीसा बी, इब्राहिम शहा आणि मुतजीम, यांच्यासोबत सदर ठिकाणी जाऊन विनाकारण वादाला सुरुवात केली. “तू माझ्या बहिणीसोबत भांडण का करतोस?” असे म्हणत मुस्तकीन याने सोबत नेलेल्या लोखंडी पाईपने इरफान यांच्या डोक्यात, डाव्या डोळ्यावर आणि उजव्या भुवईवर लोखंडी पाईपने जबर प्रहार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेले इरफान रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही बाब लक्षात येताच इरफानचे वडील त्याला वाचवण्यासाठी धावून गेले असता, आरोपीची त्यांच्यासोबतही झटापट होऊन इरफानचे वडिलही गंभीर जखमी झाले. मारहाण सुरू असताना इतर आरोपींनी देखील इरफानला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. जर पुन्हा जबीनाबीला त्रास दिला, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आहे आहे.
या प्रकरणी इरफान शहा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू टाकरखेडे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!