खेळ व मनोरंजन

जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभ

खेळाडूंच्या पथसंचालनात आकर्षक देखाव्यांचा सामाजिक संदेश

बुलढाणा (प्रतिनिधी): स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभास उपस्थित असलेल्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी सहभागी खेळाडूंच्या पथकांनी केलेले पथसंचलन सामाजिक संदेशाच्या आकर्षक देखाव्यांनी लक्षवेधक ठरले.

अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्हा परिषद मधील सुमारे ११५० खेळाडूंनी आपल्या पथसंचालनात विविध सामाजिक आशयाधारित विषयांवर अनुरूप वेशभूषा, रंगभूषा, संगीत व संवाद या माध्यमातून केलेले सादरीकरण उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर पाच ही जिल्ह्यांच्या सहभागी स्पर्धकांनी उपस्थितांना मानवंदना दिली.

सर्वप्रथम जिल्हा परिषद अकोल्याच्या सहभागी खेळाडू स्पर्धकांनी आपल्या पथसंचालनात लोककलांचा जागर केला. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या कीर्तन, पोवाडा, भारुड, लावणी, कोळी नृत्य, वारली नृत्य, वाघ्या मुरळी इत्यादी वैविध्यपूर्ण लोककलांचे सादरीकरण या चमूने उपस्थितांसमोर केले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी जुळलेली या लोककलांची नाळ या माध्यमातून अधोरेखित करण्यास अकोला जिल्हा परिषदेची चमू यशस्वी ठरली.

महाराष्ट्राची मायबोली असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा लक्षात घेता शासनाचे आभार व्यक्त करण्यासोबतच मराठी भाषेचे साहित्याचे व संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजेत. त्यासाठी मराठी शाळांची आवश्यकता व भूमिका सादर करणारे प्रदर्शन बुलढाणा जिल्हा परिषदेच्या चमूने केले.

अमरावती जिल्हा परिषदेने श्री संत गजानन महाराजांची भूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या या विभागीय महोत्सवाच्या अनुषंगाने अमरावती ते बुलढाणा ही संत श्री गजाननाची शेगावीची वारी काढली. वारकरी संप्रदाय , वारीची परंपरा यासोबतच श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने सर्व स्तरातील यात्रेकरूंसाठी उपलब्ध विनामूल्य अन्नछत्र, यात्रेकरू निवास, सेवाधारी वृत्ती, स्वच्छता व स्वयंशिस्त इत्यादी विविध गुणवैशिष्ट्ये दर्शविणारे प्रासंगिक सादर केले.हे सगळे अनुभवत असतांना मान्यवरांचा मंच देखील नतमस्तक झाला.उपस्थितांनी हात जोडुन गजानन महाराजांना अभिवादन केले.

मन के जीते जीत है, मन के हारे हार।

हार गए जो बिन लड़े। उन पर है धिक्कार ।। हा ज्वाज्वल्य मराठी अभिमान व स्वाभिमान दर्शविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्यातील संवादाचा तसेच त्याग व बलिदानाचा ऐतिहासिक देखावा वाशिमच्या जिल्हा परिषद चमुनी सादर केला.

सामाजिक विषमतेचे विदारक दृश्य दर्शवित संत गाडगेबाबांचा भुकेल्याला अन्न द्या हा संदेश रुजविणारी भुकेची कहाणी अतिशय संवेदनशीलतेने जिल्हा परिषद यवतमाळच्या चमूने सादर केली. या अतिशय संवेदनशील व हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पणावल्या. पाच ही जिल्ह्यांच्या संघांनी सादर केलेल्या या आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांमुळे उद्घाटन समारंभाचे पथसंचलन आकर्षक, लक्षवेधक व हृदयस्पर्शी ठरले. सर्व छायाचित्र-रविकिरण टाकळकर

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!