
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : खामगाव शहराला गुन्हेगारी तशी काही नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचे धाडस कमालीचे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. स्वतःला पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या एका टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नांदुरा रोडवरील नवरंग मार्टसमोर एका ७२ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याला चकवा देऊन त्यांची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत नेमकीस उघडकीस आली.
खामगाव शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या अभंग कॉलनीत राहणारे चंद्रकांत दत्तोपंत झापर्डे (वय ७२ वर्षे) हे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. सकाळी साधारण ८.४५ वाजेच्या सुमारास फेरफटका मारून ते आपल्या घराकडे परतत असताना नवरंग मार्टजवळ दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. सदर इसमांनी आपण पोलीस अधिकारी असल्याची ओळख यांना दिली. तसेच “पुढे तपासणी सुरू आहे, तुम्ही अंगावर दागिने घालून फिरू नका,” असे सांगून त्यांनी झापर्डे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या उजव्या हाताच्या बोटातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत १५ हजार ८५० रुपये) काढायला लावत ती अंगठी एका रुमालात गुंडाळून ठेवल्याचे नाटक केले आणि तो रुमाल झापर्डे यांच्या खिशात ठेवला. काही वेळाने झापर्डे यांनी खिसा तपासून पाहिला असता, त्यांना रुमालात अंगठी दिसली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झापर्डे यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास प्रदिप मोठे हे करीत आहेत.
खामगाव परिसरात घडलेली ही पहिलच घटना नसून यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. तोतया पोलीस बनून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.



