अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील हॉटेल आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर करणाऱ्यांविरुद्ध महसूल आणि पुरवठा विभागाने आज ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने शहरातील २० ते २२ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या धडक कारवाईत ७ हॉटेल चालकांकडून घरगुती सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता, भविष्यात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र व राज्य सरकारने घरगुती एलपीजी गॅस वापराबाबत कडक नियमावली जाहीर केली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेवर आणि पुरेसा गॅस पुरवठा व्हावा, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही व्यावसायिक स्वार्थापोटी घरगुती गॅसचा वापर हॉटेलमध्ये करून नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर तहसीलदार समाधान सोनवणे यांनी १० कर्मचाऱ्यांची एक विशेष समिती गठित करून या ‘काळाबाजार’ करणाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंकले.

आज १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासूनच पुरवठा विभागाचे पथक ॲक्शन मोडमध्ये आले होते. शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि हायवे लगतच्या २० ते २२ हॉटेलवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. प्रशासकीय पथक अचानक दारात उभे ठाकल्याने हॉटेल चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. या कारवाईचे नेतृत्व पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे आणि नायब तहसीलदार नामदेव राठोड यांनी केले. पथकाने बारकाईने तपासणी केली असता, ७ नामांकित हॉटेल्समध्ये व्यावसायिक सिलिंडरऐवजी घरगुती वापराचे सिलिंडर सर्रास वापरले जात असल्याचे आढळून आले. या मोहिमेत महसूल आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय गोपनीयरीत्या नियोजन केले होते. या पथकात पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे, नायब तहसीलदार नामदेव राठोड, मंडळ अधिकारी, के.जी. राजपूत, तलाठी धीरज जाधव व एम.सी. एदलाबादकर, पुरवठा शाखेचे महसूल सहाय्यक निशांत चव्हाण, महसूल सेवक निलेश म्हात्रे, निलेश तायडे, सतीश राठोड या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
जप्ती आणि पुढील कायदेशीर पाऊल
या धडक मोहिमेत पथकाने ७ घरगुती गॅस सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले. गॅस एजन्सीच्या माध्यमातून या सिलिंडरचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित हॉटेल चालकांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. “सामान्य नागरिकांच्या हक्काचा गॅस व्यावसायिक कारणांसाठी वापरणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील,” असा कडक इशारा पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी दिला आहे.
व्यावसायिकांमध्ये घबराट
या कारवाईची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच अनेक हॉटेल चालकांनी आपल्याकडील घरगुती सिलिंडर लपवण्याची लगबग सुरू केली होती. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दोषींना सवलत मिळाली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेचे सामान्य जनतेकडून स्वागत होत आहे, कारण घरगुती सिलिंडरच्या तुटवड्यामुळे गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.