धाड नगरीत घुमणार ‘जय श्रीराम’चा जयघोष!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): चैत्र शुद्ध नवमीचा तो सुवर्णक्षण, अयोध्येच्या राजाचे आगमन आणि अंगावर शहारे आणणारा भक्तीचा महाकुंभ…धाड नगरी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘श्रीराम जन्मोत्सव समिती’ आणि ‘श्रीराम मंदिर संस्थान, धाड’ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ‘श्रीराम जन्मोत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षीचा सोहळा केवळ एक उत्सव नसून, ती एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्वणी असणार आहे. पोस्टरवर झळकणारे प्रभू श्रीरामाचे तेजस्वी रूप आणि पार्श्वभूमीला असलेले संकटमोचन हनुमानाचे चित्र पाहताच भाविकांच्या मनात उत्साहाचे उधाण आले आहे. धाडच्या मातीत भक्तीचा हा मळा फुलवण्यासाठी समितीने रात्रीचा दिवस करून तयारी पूर्ण केली आहे.

उत्सवाचे मुख्य आकर्षण: सुर, ताल आणि जल्लोष!

यंदाच्या सोहळ्यात भाविकांचे डोळे दिपवणारी खास आकर्षणे केंद्रस्थानी असणार असून प्रसिद्ध गायक सिंगर HK आपल्या पहाडी आवाजात रामनामाचे अभंग आणि भक्तीगीते सादर करणार आहेत. त्यांच्या सुरांनी धाडची संध्याकाळ भक्तीमय होणार आहे. महाराष्ट्राची शान असलेला ‘राजा पंढरीचा बँड’ आपल्या ठेक्यावर तरुणाईला थिरकायला लावणार आहे. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव होताच आकाशात होणारा ‘पेपर ब्लास्ट’ आणि फुलांची उधळण सोहळ्याची भव्यता द्विगुणित करणारी ठरणार आहे.मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामाची भव्य आणि देखणी मूर्ती, जिच्या दर्शनासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून भाविकांची गर्दी उसळणार आहे.

अंगावर शहारे आणणारी सज्जता

“मुकुट शिरावर, कटी पितांबर…” या ओळींप्रमाणेच अवघी धाड नगरी रामाच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांनी शहराचे रूप पालटले आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यात केवळ धाडच नव्हे, तर परिसरातील हजारो रामभक्त सहभागी होणार आहेत. शिस्तबद्ध नियोजन, भव्य मिरवणूक आणि भक्तिपूर्ण वातावरण यामुळे हा सोहळा जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरत आहे. समितीच्या वतीने सर्व रामभक्तांना या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!