मासरूळ सर्कलमध्ये महावितरणचा ‘अंधेर नगरी’ कारभार: शेतकऱ्यांचा संयम सुटला, आता आंदोलनाचा इशारा!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि अखंडित वीज पुरवठ्याच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मासरूळ सर्कलमधील शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र कायमचा अंधार लिहिला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात दररोज संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अघोषित लोडशेडिंग सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः डोंगराळ भागात वसलेल्या गुम्मी गावातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या छायेत जीव मुठीत धरून अंधारात राहावे लागत आहे.

मासरूळ सर्कलमध्ये महावितरणने विचित्र धोरण अवलंबले आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा शेतकऱ्यांना घरात प्रकाशाची आणि शेतात पाण्याची गरज असते, त्याच वेळी वीज गायब केली जाते. गुम्मी गाव चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेले आहे. या भागात हिंस्त्र श्वापदांचा मोठा वावर आहे. अंधारामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत मीटर बसवले असून ते नियमित वीज बिल भरतात. असे असूनही त्यांना ‘सावत्र’ वागणूक दिली जात आहे. धाड सर्कल आणि इतर भागांत शेतीसाठी नियमित वीज उपलब्ध असताना केवळ मासरूळ आणि मासरुळ सर्कललाच लक्ष का केले जात आहे? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. वीज पुरवठा हा मानवी हक्काचा आणि ग्राहक संरक्षणाचा भाग आहे. जर शेतकरी रीतसर वीज बिल भरत असतील, तर त्यांना पूर्वसूचना न देता तासनतास अंधारात ठेवणे हा कायद्याचे उल्लंघन करणारा प्रकार आहे.

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

शेतकऱ्यांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, “वरून जीआर (शासन निर्णय) आहे,” असे सांगून अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. प्रत्यक्षात शेजारील सर्कल्समध्ये वीज सुरू असताना केवळ याच भागासाठी वेगळा जीआर कसा असू शकतो? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात असून आम्ही डोंगराळ भागात राहतो. रात्री १० वाजेपर्यंत वीज नसल्यामुळे घरात साधे जेवण करणेही कठीण झाले आहे. साप-विंचवांची भीती सतत असते. महावितरणने जर ही लोडशेडिंग थांबवली नाही, तर आम्ही कार्यालयाला टाळे ठोकू, अशी प्रतिक्रिया गुम्मी येथील पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा या अंधारातून संतापाचा मोठा जाळ पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही, एवढे मात्र खरे!

आता आरपारची लढाई!

वारंवार विनंती करूनही महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने, आता मासरूळ सर्कलचे शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर ‘कंदील मोर्चा’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!