अमरावती,(प्रतिनिधी): अमरावती… विदर्भाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे शहर सध्या एका अशा गुढ प्रकरणाने हादरले आहे, ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. एका आलिशान इमारतीच्या बंद दाराआड काय चालत होतं? रात्रीच्या काळोखात तिथे कोण येत होतं? आणि या सगळ्या प्रकरणाचा माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी नेमका काय संबंध? या प्रश्नांनी अमरावतीच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीमधील एका उच्चभ्रू वस्तीत असलेली ती चार मजली इमारत. एरव्ही शांत असणारा हा परिसर गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत होता. शेजाऱ्यांच्या मते, रात्रीचे १२ वाजले की या इमारतीसमोर महागड्या गाड्यांची रांग लागायची. काळ्या काचा असलेल्या गाड्यांमधून काही लोक आत जायचे आणि पहाटेच्या सुमारास बाहेर पडायचे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला वाटलं की कदाचित एखादं ऑफिस असेल, पण रात्री उशिरापर्यंत तिथे अल्पवयीन मुला-मुलींचा वावर वाढला तेव्हा आमचा संशय बळावला.” ही केवळ संशयाची ठिणगी नव्हती, तर एका मोठ्या स्फोटाची पूर्वतयारी होती.
काही धाडसी शेजाऱ्यांनी या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे ठरवले. त्यांनी जे पाहिले ते धक्कादायक होते. एका शेजाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “इमारतीच्या बाल्कनीत काही लहान मुले आणि मुली विचित्र अवस्थेत दिसायच्या. तिथे मोठ्या आवाजात संगीत चालायचे आणि अनेकदा वादविवादाचे आवाजही यायचे.” जेव्हा रहिवाशांनी या गोष्टीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना धमकावण्यात आल्याचाही आरोप आहे. “आम्हाला सांगण्यात आलं की हे मोठ्या लोकांचं काम आहे, तुम्ही यात पडू नका,” असं एका वृद्ध नागरिकाने सांगितलं. पण, जेव्हा प्रकरण हाताबाहेर गेलं, तेव्हा रहिवाशांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि एका मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला.
नवनीत राणा आणि पोक्सोचा पेच
या संपूर्ण गुन्हेगारी कथानकात सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा या प्रकरणाचे धागेदोरे माजी खासदार नवनीत राणा यांच्याशी जोडले गेले. अमरावती ग्रामीण पोलिसांनी सोशल मीडियावर पीडित मुलींची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य किंवा व्हिडिओ प्रसारित न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या संवेदनशील प्रकरणात राजकीय चर्चा आणि विधानांदरम्यान पीडितांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या इमारतीत घडलेल्या एका घटनेदरम्यान किंवा त्या संदर्भातील माहिती देताना नवनीत राणा यांनी कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन केले असून भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही अल्पवयीन पीडितेची ओळख सार्वजनिक करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. विरोधकांचा असा दावा आहे की, राणा यांनी एका प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलाची/मुलीची ओळख पटेल असे कृत्य केले किंवा तशी विधाने केली. यामुळे पीडितेच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन झाले असून, त्यांच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
पोलीस तपासातील ‘क्राइम’ अँगल
पोलिसांनी जेव्हा या इमारतीत प्राथमिक तपास केला, तेव्हा काही संशयास्पद वस्तू आणि सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीतील डीव्हीआर जप्त करण्यात आला असून, त्यातील रात्रीच्या वेळचे फुटेज तपासले जात आहे. त्या रात्री इमारतीत हजर असलेल्या काही अल्पवयीन मुलांची बाल कल्याण समितीसमोर साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय रॅकेटशी जोडलेले आहेत का, याचाही तपास गुन्हे शाखा करत आहे.
राजकीय दबावाचा खेळ?
एकीकडे गुन्हा आणि तपासाची चक्रं फिरत असताना दुसरीकडे राजकारणही शिगेला पोहोचलं आहे. नवनीत राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा मला बदनाम करण्याचा डाव आहे, मी नेहमीच महिला आणि मुलांच्या हक्कासाठी लढले आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तर विरोधकांचे म्हणणे आहे की, “सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस राणा यांच्यावर कारवाई करण्यास कचरत आहेत. जर पोक्सो कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, अशी प्रतिक्रिया कायदाप्रिय नागरिकांमधून उमटत आहे.
राजकीय कारकिर्दीला बसू शकतो धक्का
ही केवळ एक इमारतीची गोष्ट राहिलेली नाही, तर ती एका मोठ्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न बनली आहे. त्या रात्री त्या इमारतीत नेमकं काय घडलं?, संशयास्पद हालचालींमागे कोणतं ‘रॅकेट’ कार्यरत होतं? आणि खरंच नवनीत राणा यांनी कायद्याची पायमल्ली केली का?, या प्रश्नांची उत्तरे अमरावती पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहेत. जर पोक्सो अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला, तर नवनीत राणा यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो. तूर्तास, अमरावतीकर या ‘मिस्ट्री हाऊस’च्या रहस्याचा छडा लागण्याची वाट पाहत आहेत.