अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या सातगाव म्हसला येथे दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार समज देऊन आणि यापूर्वी दोन वेळा नॉन-कॉग्निझेबल नोंदी होऊनही संबंधित आरोपीच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने अखेर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.
सातगाव म्हसला येथील रहिवासी गणेश केशरसिंग राजपूत आणि आरोपी ज्ञानेश्वर एकनाथ मुजमुले (वय ३३ वर्षे) हे एकमेकांचे शेजारी आहेत. शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या कारणावरून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन असून तो सतत मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या घराजवळ येऊन त्यांच्या आई-वडिलांना व परिसरातील नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. या त्रासाला कंटाळून राजपूत यांनी यापूर्वी दोनदा पोलिसांत तक्रार दिली होती. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर पुन्हा दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने मोठ्याने आरडाओरडा करत कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी अधिकच आक्रमक झाला आणि त्याने अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहोचले तेव्हाही आरोपी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. डॉक्टरांनी तो दारूच्या नशेत असल्याचे प्रमाणित केले.
याप्रकरणी ज्ञानेश्वर मुजमुले याच्या विरुद्ध धाड पोलिसांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धाड पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील त्रस्त नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.