धाड:सातगाव शिवारात शेतीच्या वादातून थरार; सख्ख्या चुलत भावावर जीवघेणा हल्ला!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): शेतशिवारातील किरकोळ वादाचे रूपांतर आता रक्तरंजित संघर्षात होऊ लागले आहे. धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातगाव शिवारामध्ये नाल्यातील गाळ काढण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर लाकडी काठीने अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

कुलमखेड येथील रहिवासी असलेले संजय पांडूरंग कानडजे (वय ४९ वर्षे) यांची शेती सातगाव शिवारात आहे. त्यांच्या शेताला लागूनच आरोपी संतोष रामेश्वर कानडजे याची शेती आहे. या दोन्ही शेतांच्या सीमेवर एक नैसर्गिक नाला असून पावसाळ्यातील पाण्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास, आरोपी संतोष कानडजे हा जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर घेऊन या नाल्यातील गाळ काढत होता. यावेळी फिर्यादी संजय कानडजे यांनी गाळ काढण्यास विरोध दर्शवला. “गाळ काढू नको,” असे म्हणणे संजय यांना चांगलेच महागात पडला. संतोष कानडजेने कसलाही विचार न करता हातात लाकडी काठी घेतली आणि संजय यांच्यावर तुटून पडला. “तू कोण आहेस आम्हाला अडवणारा?”, असा आरडाओरडा करत त्याने संजय यांच्या डाव्या हातावर आणि पाठीवर सपासप वार केले. ही मारहाण इतकी भीषण होती की, संजय कानडजे गंभीर जखमी झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने त्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि “पुन्हा आडवा आलास तर जीवे मारून टाकीन,” अशी उघड धमकी दिली.

याप्रकरणी जखमी संजय कानडजे यांनी धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष रामेश्वर कानडजे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १११८ (१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सोनुने हे करीत आहेत.

शेतीचा वाद की वर्चस्वाची लढाई?

ग्रामीण भागात शेतीच्या वादातून होणारे हल्ले आता चिंतेचा विषय बनले आहेत. नाल्याचा गाळ काढण्यासारख्या कामात सामंजस्य दाखवण्याऐवजी थेट हत्यार (काठी) उगारल्याने कुलमखेड आणि सातगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!