खड्डे बुजवा नाहीतर माझ्या अंगावर गाडी घाला! लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल

मेहकर,(प्रतिनिधी): एकीकडे जिल्ह्यात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, दुसरीकडे जनतेच्या हितासाठी रस्त्यावरील खड्ड्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार मेहकर येथे समोर आला आहे. शहरातील इंद्रप्रस्थ चौक ते बस स्थानक दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या एका कार्यकर्त्याने ‘खड्डे बुजवा नाहीतर गाडी माझ्या अंगावर घाला’ असा फलक हाती घेऊन आंदोलन केले. मात्र, या आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित आंदोलकावर गुन्हा दाखल केला आहे.
१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास **गजानन माधव बोरकर (वय ३८ वर्षे) रा. सारंगपूर जे यशवंत सेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, यांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केले. इंद्रप्रस्थ चौक ते बस स्थानक या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोरकर यांनी रस्त्याच्या मधोमध बसून निषेध व्यक्त केला. त्यांच्या हातात असलेल्या फलकावर “खड्डा बुजवा नाही तर गाडी माझे अंगावर घाला. जाहीर निषेध, जाहीर निषेध!”, असा मजकूर लिहिलेला होता. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अंमलदार अमोल भाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गजानन बोरकर यांनी रस्त्याच्या मधोमध बसून लोकांच्या वाहनांना अडथळा निर्माण केला आणि आम जनतेला त्रास होईल असे कृत्य केले. या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी गजानन बोरकर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १२६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार सदानंद चाफले हे करत आहेत.
मेहकर शहरातील मुख्य रस्ते गेल्या काही काळापासून खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे न बुजवल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गजानन बोरकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या गुन्ह्यामुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत, ज्यामुळे गुन्हेगारी वाढत असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा गंभीर विषयांकडे पोलीस प्रशासन म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. हे खड्डे प्रशासनाने वेळेवर का बुजवले नाहीत? जर प्रशासनाने आपले काम चोख बजावले असते, तर एखाद्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरण्याची वेळच आली नसती. लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणे कितपत योग्य आहे?, पोलिसांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा झाला. मात्र, नागरिक असा सवाल करत आहेत की, गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर असलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे जो रोजचा अडथळा निर्माण होतो, त्याची दखल प्रशासन कधी घेणार?, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!