लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, मारहाण अन् ७ लाखांची लूट; खामगावातील नराधमाचे संतापजनक कृत्य!

अजय टप

खामगाव,(प्रतिनिधी): लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका महिलेवर दीर्घकाळ शारीरिक अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिला बेदम मारहाण करून ७ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून शहरात एकच खळबळ माजली आहे.

पीडित महिला (वय २९ वर्ष) आणि आरोपी शेख एफाज शेख अनिस (वय २८ वर्ष, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) यांचे २०१९ पासून संबंध होते. आरोपीने पीडितेशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केले. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला शेगाव रोडवर नेले. तिथे लग्नास स्पष्ट नकार देत नराधमाने पीडितेला धावत्या मोटारसायकलवरून खाली ढकलून दिले. एवढ्यावरच न थांबता, रस्त्याच्या कडेला पडलेल्या काठीने तिला मारहाण करून जखमी केले. “मला तुझ्याशी लग्न करायचे नाही” असे ओरडत त्याने पीडितेला अश्लील शिवीगाळ केली आणि जीवाने मारण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी तिच्याकडे असलेले ४ तोळे सोन्याचे दागिने (दोन पोथ, दोन अंगठ्या, दोन कानातले जोड) किंमत अंदाजे ४ लाख रुपये, रोख ३ लाख रुपये, असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपी शेख एफाज याने बळजबरीने चोरून नेला आणि तिथून पळ काढला.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६९, ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार आंधळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!