खामगाव: तरुणीचे फोटो चोरून इन्स्टाग्रामवर अश्लील प्रदर्शन; सायबर नराधमांचे बुलढाण्यात नीच कृत्य! 

अजय टप

खामगाव,(प्रतिनिधी): डिजिटल युगात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका सुशिक्षित तरुणीचे खाजगी फोटो चोरून, तिची बदनामी करण्याच्या हेतूने इन्स्टाग्रामवर अश्लील मजकुरासह व्हायरल करणाऱ्या अज्ञात सायबर विकृतांविरुद्ध बुलढाणा सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संतापजनक प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाने नागरिकांमध्ये दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.

खामगाव येथील सनि पॅलेस टॉकीज परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर तरुणीच्या आईच्या मोबाईलमध्ये असलेले त्यांचे काही फोटो एका अज्ञात इसमाने चोरले. हे फोटो केवळ चोरलेच नाहीत, तर त्यांचा वापर अत्यंत खालच्या थराची बदनामी करण्यासाठी करण्यात आला.

तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने इन्स्टाग्रामवर ‘lovve2001’ आणि ‘lust2005_’ या नावांनी बनावट खाती तयार केली. या खात्यांवरून फिर्यादी तरुणीचे फोटो तिच्या संमतीशिवाय विविध इन्स्टाग्राम ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आले. केवळ फोटो पोस्ट करून हा नराधम थांबला नाही, तर त्याने त्या फोटोंवर अत्यंत अश्लील आणि बीभत्स कमेंट्स करून पीडित तरुणीची सामाजिक बदनामी केली. आरोपीचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडित तरुणीचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तरुणीला गेल्या काही दिवसांपासून रात्री-अपरात्री अज्ञात क्रमांकावरून अश्लील फोन आणि मेसेज येत आहेत. या प्रकारामुळे पीडित तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, तिचे जगणे असह्य झाले आहे. शिक्षण घेणाऱ्या एका तरुण मुलीच्या आयुष्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकाराने सायबर गुन्हेगारांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे.

या प्रकरणाची दखल घेत बुलढाणा सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६(२), माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ (C) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहेत.

सायबर गुन्हेगारांना इशारा!

सोशल मीडियाचा वापर करून महिलांची बदनामी करणाऱ्यांना हा गुन्हा म्हणजे एक मोठा इशारा आहे. एखाद्याच्या संमतीशिवाय फोटो वापरणे, अश्लील टिप्पणी करणे आणि मोबाईल नंबर व्हायरल करणे हा अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा ठरू शकतो.

नागरिकांना आवाहन

आपल्या मोबाईलमधील खाजगी माहिती, फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवा. अनोळखी व्यक्तींना आपले गॅजेट्स देऊ नका आणि सोशल मीडियावर प्रायव्हसी सेटिंग्जचा वापर करा. जर असा कोणताही त्रास होत असेल, तर घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!