अजय टप
बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा शहरात नात्याला काळिमा फासणारी आणि विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २३ वर्षीय विवाहितेसोबत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या एका नराधमाने, तिला भररस्त्यात सोडून तिची दुचाकी आणि मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अनिल पांडुरंग सनासे याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा शहरातील जगदंबा नगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेचे पतीसोबत फारकत झालेली असून तिला एक लहान मुलगा आहे. आरोपी अनिल पांडुरंग सनासे (वय ३० वर्षे) रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर याने महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. “तुझी फारकत झाली असली तरी मी तुझ्याशी लग्न करून तुला सुखात ठेवेन,” असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.
हॉटेल ते मित्राचे घर; वासनेचा नंगानाच!
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ पासून आरोपीने तिला जाळ्यात ओढले होते. शेगाव येथील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्या असहायतेचा फायदा घेतला. इतकेच नव्हे तर, १ जानेवारी २०२६ रोजी त्याने आपल्या मित्राच्या (किशोर राऊत, रा. मादणी) घरी नेऊन तिच्यावर बळजबरी केली. वासनेची भूक न शमलेल्या या नराधमाने १६ आणि १७ एप्रिल २०२६ रोजी बुलढाण्यातील रामनगर भागात आपल्या बहिणीच्या घरी देखील फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पाच मिनिटांचा बहाणा आणि प्रियकर पसार!
१८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे दोघे बुलढाण्यातील जयस्तंभ चौक येथे पावभाजी खाण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते लेंडी तलाव परिसरात गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी अनिल सनासे याने आपला खरा चेहरा दाखवला. “मी पाच मिनिटात येतो” असे सांगून त्याने फिर्यादीची सुझुकी एक्सेस स्कुटी क्रमांक एमएच-२८-सिए-२८-१८१२ आणि तिचा विवो कंपनीचा मोबाईल घेतला आणि तिथून पळ काढला. बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने पीडितेने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बंद होता.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या? तपास चक्रांकार!
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने तातडीने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिल सनासे विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम हे करीत आहेत.
समाजासाठी धोक्याची घंटा!
एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. “पाच मिनिटात येतो” म्हणणारा तो प्रियकर प्रत्यक्षात एक ‘भामटा’ निघाला, ज्याने एका महिलेचा विश्वास तर तोडलाच, पण तिची मालमत्ताही लंपास केली. आता बुलढाणा पोलीस या फरार नराधमाच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.