अजय टप
नांदुरा,(प्रतिनिधी): शहरातील हॉटेल ‘गावरान तडका’ समोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण रक्तरंजित घटनेत झाले आहे. दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी एका २७ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या पोटावर चाकूने दोन वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अविनाश विश्वनाथ रनित (वय २७ वर्षे), रा. तथागत नगर, वार्ड नं. १, नांदुरा हा आपल्या मित्रासह (गणेश भोटकर) अंडी आणण्यासाठी हॉटेल गावरान तडका येथे गेला होता. दरम्यान, तेथे उपस्थित असलेला आरोपी गट्टू बापू देशमुख (वय ४५ वर्षे) हा दारूच्या नशेत होता. अविनाशला पाहताच त्याने विनाकारण अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “मी तुला ओळखतो, तुझ्या बापाला तुझे नाव सांगतो,” असे म्हणत आरोपीने वाद उकरून काढला. अविनाशने “तुम्ही वाटल्यास मला मारून घ्या, पण शिवीगाळ करू नका,” अशी विनंती केली. मात्र, याच गोष्टीचा राग धरून आरोपी गट्टू देशमुख आणि त्याचा साथीदार किशोर सरोदे (वय ३२ वर्षे) या दोघांनी संगणमत करून अविनाशला हॉटेलबाहेर ओढले. दोन्ही आरोपींनी सुरुवातीला अविनाशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, आरोपी किशोर सरोदे याने आपल्याकडे असलेला तीक्ष्ण चाकू काढून अविनाशच्या पोटावर सपासप दोन वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अविनाश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली असता आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच जखमी अविनाशला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या लेखी जबाबावरून नांदुरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
