https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

खामगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या!; लग्नात नाचण्याच्या वादातून तरुणाची केली होती निर्घृण हत्या

खामगाव,(प्रतिनिधी): एका लग्नसमारंभातील आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले. लग्नात नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना खामगाव येथे घडली. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात राहणारे मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६ वर्षे) यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२ वर्षे) हा २५ एप्रिल रोजी एका लग्नसमारंभात गेला होता. तिथे नाचत असताना त्याचा काही तरुणांशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शोएबला गाठून त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर दगडाने गंभीर प्रहार केले. या भीषण हल्ल्यात शोएबचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद साबीर यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम १०३(१), ११८(२), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगरचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी आरोपींच्या शोधासाठी शोध पथके रवाना केली. तपास सुरू असताना पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी हे पळून जाण्याच्या बेतात असून ते वरवट बकाल परिसरात आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरवट बकाल परिसरात सापळा रचला. हे आरोपी मध्य प्रदेशच्या सीमेवर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुजम्मील खान जमील खान (वय २२ वर्षे) रा. इनामुन मस्जिद जवळ, बर्डे प्लॉट (खामगाव), शेख तालीब शेख रहेमान (वय २२ वर्षे) रा. अन्सारी मेडिकल जवळ, बर्डे प्लॉट (खामगाव), फैजान खान बुढन खान (वय २५ वर्षे) रा. मदीना मस्जिद जवळ, बर्डे प्लॉट (खामगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, उपरोक्त आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून उपरोक्त गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

यांनी बजावली यशस्वी कामगिरी

अवघ्या काही तासांत हत्येचा छडा लावून आरोपींना गजाआड केल्यामुळे खामगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वात सपोनी मंदार पुरी, पोलीस अंमलदार संदिप टाकसाळ, चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के आणि सायबर सेलचे कैलास ठोंबरे, राजु आठवे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!