https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

शहापूरमध्ये ‘रोमिओ’चा उच्छाद; विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या विकृताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

अजय टप

खामगाव,(प्रतिनिधी): एकीकडे स्त्री सन्मानाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खामगाव तालुक्यातील शहापूर येथे एका २७ वर्षीय तरुणाने विवाहीत महिलेचा विनयभंग करून ‘रोमिओगिरी’चे किळसवाणे दर्शन घडवले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहापूर येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय महिला आपल्या घरी असताना, त्यांच्याच गल्लीत राहणारा आरोपी रुषीकेश (वय २७ वर्षे) हा गेल्या काही दिवसांपासून त्यांना सातत्याने त्रास देत होता. आरोपी रुषीकेश हा विनाकारण पीडितेच्या घरासमोरून चकरा मारणे, त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, अशा थिल्लर चाळ्यांतून आपली विकृत मानसिकता प्रदर्शित करत होता. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास, मर्यादा ओलांडत आरोपी थेट पीडितेच्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचला. तिथे उभे राहून तो पुन्हा एकदा तिच्याकडे अश्लील नजरेने पाहू लागला. पीडितेने त्याला जाब विचारला, तेव्हा आरोपीने लज्जास्पद वर्तन करून तिच्यासोबत लगट करण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सामाजिक दबावामुळे किंवा भीतीपोटी तक्रार करण्यास विलंब झाला असला, तरी आरोपीचा वाढता त्रास सहन न झाल्याने शेवटी पीडितेने २६ एप्रिल २०२६ रोजी खामगाव ग्रामीण पोलीस पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रुषीकेश याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करीत आहेत.

रोमिओगिरीला बसणार लगाम?

शहापूरसारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. आरोपी आणि फिर्यादी एकाच समाजाचे आणि एकाच मोहल्ल्यातील असूनही, आरोपीने दाखवलेली ही ‘रोमिओगिरी’ समाजाच्या ढासळत्या मानसिकतेचे लक्षण मानली जात आहे. भरदिवसा घराच्या दरवाजापर्यंत येऊन महिलेला त्रास देण्याचे धाडस करणाऱ्या अशा विकृत तरुणांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे झाले आहे.

महिलांनी धैर्याने पुढे येण्याची गरज

गावागावांत ‘रोमिओ’ म्हणून मिरवणाऱ्या अशा टवाळखोरांना आता चाप लावण्याची वेळ आली आहे. घरासमोर चकरा मारणे किंवा वाकड्या नजरेने पाहणे ही केवळ खोडसाळपणाची कृती नसून, तो गंभीर फौजदारी गुन्हा आहे. महिलांनी अशा त्रासाविरुद्ध गप्प न बसता धैर्याने पुढे येऊन तक्रार केल्यास अशा गुंडांचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!