https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

बोराखेडी हादरले! पोटदुखीचे निमित्त करून घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; घातपाताची शक्यता की आणखी काही?

अजय टप
मोताळा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तरुण मुलीने ‘पोटात दुखत आहे’ असे सांगून घराबाहेर पाऊल टाकले, मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, पालकांच्या जीवाची घालमेल सुरू आहे.
गोसिंग येथील रहिवासी आणि शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एकनाथ उत्तम शिंदे (वय ४७ वर्षे) यांची मुलगी  पायल एकनाथ शिंदे (वय १९ वर्षे) ही सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली. तिने आपल्या कुटुंबीयांना ‘माझ्या पोटात दुखत आहे, मी शौचास जाऊन येते’ असे सांगितले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पायल घरी न आल्याने हवालदिल झालेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ गावभर तिचा शोध घेतला. गावातील ओळखीच्या लोकांकडे, मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, कोठेही तिचा पत्ता लागला नाही. अखेर धास्तावलेल्या पित्याने बोराखेडी पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार नोंदवली. पोलीस दप्तरी नोंदवलेल्या माहितीनुसार, बेपत्ता पायलची उंची ५ फूट ५ इंच, रंग सावळा असून तिने अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची लेगीज घातलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडसिंग चव्हाण हे करत आहेत. पहाटेच्या अंधारात १९ वर्षांची मुलगी घरातून निघून जाते आणि तिचा थांगपत्ता लागत नाही, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही मुलगी स्वतःहून निघून गेली की तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला? तिला कोणी आमिष दाखवून पळवून नेले का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. वरील वर्णनाची मुलगी कोठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने बोरखेडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!