अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दसरखेड शिवारात सध्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, आता थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरून चोऱ्या करण्याचे धाडस चोरटे दाखवत आहेत. दसरखेड येथील एका तरुण शेतकऱ्याची ८० हजार रुपये किमतीची नवी कोरी होंडा युनिकॉन दुचाकी दोन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गाडी सुरू झाल्याचा आवाज आल्याने मालकाने चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
दसरखेड येथील रहिवासी महेद्र छगन महाजन (वय २५ वर्षे) यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर येथील आनंद होंडा शोरूममधून काळ्या रंगाची होंडा युनिकॉन क्रमांक एमएच-५६-डी-२५४९ खरेदी केली होती. शेती आणि दूध विक्रीच्या व्यवसायासाठी ते या गाडीचा वापर करत असत. महेंद्र यांचे शेत आणि गुरांचा गोठा गावापासून साधारण ५०० मीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत आहे. २५ एप्रिल २०२६ च्या रात्री महेंद्र हे त्यांचे वडील आणि काकांसोबत गोठ्यावर झोपलेले होते. पहाटे ३.३५ वाजेच्या सुमारास अचानक महेंद्र यांना त्यांच्या दुचाकीच्या इंजिनचा आवाज आला. आवाजाने खडबडून जागे झालेल्या महेंद्र यांनी पाहिले असता, त्यांच्या खाटेजवळ लावलेली दुचाकी एक हिरवा शर्ट घातलेला अज्ञात इसम चालू करून पळवत होता. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. महेंद्र महाजन यांनी एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप पवार हे करत आहेत.
‘लवकर चल’ आणि चोरटे पसार!
महेंद्र यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला आणि त्या इसमाला थांबवण्याचा प्रयत्न करत त्याच्या मागे धावले. मात्र, रस्त्यावर आधीच एका दुचाकीवर लाल शर्ट घातलेला दुसरा साथीदार दबा धरून बसला होता. महेंद्र जवळ येत असल्याचे पाहून लाल शर्टवाल्याने आपल्या साथीदाराला जोरात “चल लवकर, जोरात चल!”, अशी साद घातली. त्यानंतर दोन्ही चोरट्यांनी महामार्गाच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. महेंद्र यांनी बराच वेळ पाठलाग केला, परंतु भरधाव वेगामुळे चोरटे डोळ्यादेखत पसार झाले.