बुलढाणा,(प्रतिनिधी): तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पारदर्शक कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने गरुडभरारी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या माहे फेब्रुवारी २०२६ च्या मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने २०१ पैकी २०१ गुण मिळवून राज्यात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, हा बहुमान मिळवून देण्यात अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी अमोल गायकवाड आणि त्यांच्या समर्पित टीमचा सिंहाचा वाटा आहे.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो, नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून साकारलेला सीसीटीएनएस प्रकल्प संपूर्ण देशात राबवला जातो. या प्रणालीमध्ये पोलीस ठाण्यातील एफआयआर नोंदवण्यापासून ते तपासाच्या प्रत्येक टप्प्याची ऑनलाईन नोंद करणे अनिवार्य असते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ३४ पोलीस स्टेशन सध्या पूर्णपणे संगणकीकृत असून त्यांचे कामकाज ऑनलाईन सुरू आहे.
फेब्रुवारी २०२६ च्या मूल्यमापनात जिल्ह्याने Success Stories आणि ITSSO अद्ययावत करणे. Cri-MAC आणि FIR Publish करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करणे. e-साक्ष, CDR-1 आणि CDR-2 मधील अचूकता. Zero/Regular FIR Transfer या निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख
बुलढाणा पोलीस दलाचे हे यश अपघाती नसून ते गेल्या सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ आहे. नोव्हेंबर २०२५ राज्यात दुसरा क्रमांक, डिसेंबर २०२५ राज्यात प्रथम क्रमांक, जानेवारी २०२६ राज्यात प्रथम क्रमांक आणि आता फेब्रुवारी २०२६ मध्ये सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्याचे मानांकन हे पहिल्या ५ क्रमांकांच्या दरम्यान राहिले असून, हे जिल्ह्याच्या प्रशासकीय शिस्तीचे प्रतीक मानले जात आहे.
अमोल गायकवाड आणि टीम: यशाचे खरे शिल्पकार
या ऐतिहासिक यशाचे श्रेय पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक तथा सीसीटीएनएस नोडल अधिकारी अमोल गायकवाड यांना जाते. गायकवाड यांनी या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन केले आणि संपूर्ण टीमला तांत्रिक बाबींमध्ये सक्षम केले. या मोहिमेत त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, मुख्य तांत्रिक टीमचे पोलीस अंमलदार सुनील वाघमारे, किरण चिंचोले, महिला पोलीस अंमलदार दीपमाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, पोलीस अंमलदार संतोष कायंदे, महिला पोलीस अंमलदार दीपाली खर्चे, मनिषा चोरघडे, उपविभागीय कार्यालयातील पोलीस अंमलदार जीवन उबरहंडे, योगेश कुवारे, संदीप करुटले, सतिष शिंदे, गणेश काकड आणि जिल्ह्यातील सर्व ३४ पोलीस ठाण्यांचे सीसीटीएनएस हॅन्डहोल्डर्स या टीमची मोलाची साथ लाभली:
डिजिटल युगात सुरक्षिततेचा विश्वास
सीसीटीएनएस प्रणालीमुळे गुन्हेगारांचा डेटाबेस जलद गतीने उपलब्ध होतो, ज्यामुळे तपासाला गती मिळते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बुलढाणा पोलिसांनी मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याची प्रतिमा राज्यस्तरावर उंचावली असून, डिजिटल प्रशासनात बुलढाणा जिल्हा आता महाराष्ट्रासाठी ‘रोल मॉडेल’ ठरत आहे. सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.