अजय टप
नांदुरा,(प्रतिनिधी): नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथे एका जुन्या वादातून भीषण प्रकार घडला असून, एका माथेफिरू आरोपीने काळया रंगाच्या महिंद्रा थार गाडीने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
वरखेड येथील रहिवासी असलेले इंद्रसिंह रामलालसिंह राजपुत (वय ४९ वर्षे) हे व्यवसायाने शेतकरी व गिट्टी खदान चालक आहेत. मंगळवार, २८ एप्रिल रोजी कोकलवाडी येथे त्यांच्या एका नातेवाईकाच्या आईचा तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी इंद्रसिंह राजपुत हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कोकलवाडी येथील हनुमान मंदिरासमोर आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक अनिलसिंह राजपुत, प्रतापसिंह राजपुत, आतीषसिंह राजपुत आणि रामसिंह राजपुत हे देखील उपस्थित होते. हे सर्वजण मंदिरासमोर उभे राहून आपापसात चर्चा करत असतानाच, अचानक आरोपी रामेश्वर दादाराव भगत हा त्याच्या काळया रंगाच्या महिंद्रा थार क्रमांक एमएच-५६-ए-८१११ गाडीने त्या ठिकाणी आला. आरोपी रामेश्वर भगत याने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना पाहिले आणि काही क्षणातच क्रूर मनसुबा रचला. त्याने त्याची थार गाडी अचानक मागे घेतली आणि थेट जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादींच्या दिशेने वेगाने घातली. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, समोर उभे असलेले इंद्रसिंह राजपुत आणि त्यांचे इतर चार नातेवाईक जोरात बाजूला फेकले गेले.
धक्कादायक बाब म्हणजे, एकदा धडक दिल्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने पुन्हा गाडी वळवून जमिनीवर पडलेल्या इंद्रसिंह यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तिथे असलेल्या एका पाण्याच्या हाफशीचा अडथळा आल्यामुळे थार गाडी इंद्रसिंह राजपुत यांच्या अंगावर चढू शकली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
या भीषण हल्ल्यात इंद्रसिंह राजपुत यांच्या पाठीला, कमरेला, उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर मुका मार लागला आहे. त्यांच्यासोबत असलेले अनिलसिंह राजपुत यांच्या हाताला व कमरेला दुखापत झाली आहे. तर रामसिंह राजपुत, आतीषसिंह राजपुत आणि प्रतापसिंह राजपुत हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी इंद्रसिंह राजपुत यांच्या तोंडी रिपोर्टवरून आरोपी रामेश्वर दादाराव भगत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संजय पवार हे करत आहेत. आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रसंगामुळे कोकलवाडी परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.