पुष्पक मानकर
अकोला,(प्रतिनिधी): तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेमाचे नाटक रचणे आणि त्यानंतर मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, या विकृत प्रवृत्तीने आता सीमा ओलांडली आहे. सोशल मीडिया आणि गेमिंग ॲप्स हे मनोरंजनाचे साधन नसून ते गुन्हेगारांचे कुरण बनत चालले आहेत, याचाच एक भयंकर आणि संतापजनक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. एका २’५ वर्षीय विवाहित तरुणाने ‘बादशाह’ नावाचे बनावट प्रोफाईल बनवून हरियाणाच्या एका तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि तिला तब्बल पाच दिवस ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे या तरुणीची सुटका झाली असून, आरोपी जमीर काझीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आजची तरुणाई मोबाईल गेमिंगच्या आहारी गेलेली असताना, गुन्हेगार त्याचा फायदा कसा घेतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. आरोपी जमीर जाहीरउद्दीन काझी (वय २५ वर्षे) याने गेमिंग ॲपवर स्वतःचे नाव लपवून ‘बादशाह’ या नावाने एक बनावट अकाऊंट तयार केले होते. तो या माध्यमातून विविध राज्यांतील तरुणींशी संपर्क साधून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. याच दरम्यान त्याची ओळख हरियाणातील एका तरुणीशी झाली. जमीरने तिला प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवले. स्वतः विवाहित असूनही आणि एक मूल असतानाही त्याने आपली ही ओळख पूर्णपणे लपवून ठेवली होती.
पाच दिवस ‘हाऊस अरेस्ट’; तरुणीची मानसिक कोंडी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने घरात झालेल्या किरकोळ भांडणाची माहिती जमीरला दिली होती. याच संधीचा फायदा घेऊन जमीरने तिचे ‘ब्रेनवॉश’ केले. “तुला तिथे कोणीच समजून घेणार नाही, तू अकोल्याला ये, मी तुला सांभाळेन,” असे खोटे आमिष दाखवून त्याने तिला कोणालाही न सांगता हरियाणातून अकोल्यात बोलावून घेतले.
बिचारी तरुणी विश्वासाने अकोल्यात पोहोचली, पण तिथे तिच्यासमोर जे वास्तव आले ते भयानक होते. जमीरने तिला अकोल्यातील गीतानगर भागातील एका घरात नेले आणि तिथे तिला पाच दिवस डांबून ठेवले. तिला बाहेर पडू दिले जात नव्हते की कोणाशी संपर्क करू दिला जात नव्हता. ज्याला ती आपला ‘मसिहा’ समजत होती, तोच तिचा भक्षक बनून समोर उभा होता.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
इकडे हरियाणात मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंब हादरून गेले होते. त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तरुणीचा भाऊ तिचा शोध घेत अकोल्यात पोहोचला आणि त्याने तातडीने खदान पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गीता नगरमधील त्या घरावर छापा टाकला आणि तरुणीची सुखरूप सुटका केली.
गुन्हेगारांना इशारा आणि पालकांसाठी धोक्याची घंटा!
हा प्रकार केवळ एका मुलीच्या अपहरणाचा नाही, तर तो एका मोठ्या गुन्हेगारी मानसिकतेचा भाग आहे. “लव्ह जिहाद” सारख्या मुद्द्यांवरून आधीच वातावरण तापलेले असताना, अशा प्रकारे नाव बदलून तरुणींना ओलीस ठेवण्याचे प्रकार समाजासाठी घातक आहेत. अकोला पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून, पुढील कारवाईसाठी त्याला हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. अकोला पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असले तरी, अशा ‘जमीर काझी’ सारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांपासून आपल्या मुलींना वाचवणे हे समाजासमोरचे मोठे आव्हान आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यासच भविष्यात कोणाची अशी हिंमत होणार नाही! सावधान रहा, सतर्क रहा! आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापराकडे डोळसपणे पहा!