अजय टप
शेगाव,(बुलढाणा): संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीला तिचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि तिच्या कुटुंबाला जीवाने मारण्याची भीती घालून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या आईविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेगाव येथील सुरभी कॉलनी भागात राहणाऱ्या २२ वर्षीय पीडित तरुणीची ओळख खळवाडी येथील रहिवासी सुमित सुनील जाधव याच्याशी झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी सुमित याने पीडितेचे काही फोटो मिळवले. या फोटोंचा आधार घेऊन त्याने पीडितेवर दबाब टाकण्यास सुरुवात केली. १२ फेब्रुवारी २०२६ ते १२ एप्रिल २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत, आरोपीने पीडितेला वारंवार “तुझे फोटो व्हायरल करेन”, अशी धमकी दिली. इतकेच नाही तर, जर तिने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तिच्या आई-वडिलांना आणि भावाला जीवाने मारून टाकण्याची भीतीही त्याने दाखवली. या सततच्या मानसिक आणि शारीरिक दबावाखाली ठेवून आरोपीने पीडितेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडित तरुणीने अखेर धैर्याने पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार कथन केला. तिच्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलिसांनी सुमित सुनील जाधव (वय २३) आणि त्याची आई बबीता सुनील जाधव (दोन्ही रा. खळवाडी, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
