दोन तरुणी बेपत्ता तर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण;जिल्ह्यात चिंतेचे वातावरण

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): गेल्या ४८ तासांत बुलढाणा जिल्ह्यातून दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या आणि एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुलढाणा शहर, खामगाव ग्रामीण आणि रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, या घटनांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बुलढाणा शहर: संशयित तरुणासोबत तरुणी बेपत्ता

बुलढाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळगाव येथील १८ वर्षीय तरुणी, संजना मदन गवई, ही १ मे च्या रात्री घराबाहेर पडली ती परतलीच नाही. फिर्यादी मदन त्र्यंबक गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना रात्री १० ते पहाटे २ वाजेच्या दरम्यान कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. परिसरातील आणि ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संजना ही गावातीलच अविनाश रामदास डोंगरे नावाच्या तरुणासोबत जाताना दिसली आहे. यावरून अविनाशनेच तिला नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तिचा गोरा रंग, उंची ५ फूट ३ इंच, गोल चेहरा असून तिने अंगात पांढरा कुर्ता, पांढरी पँट आणि काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र हजारे हे करीत आहेत.

खामगाव ग्रामीण: ८० हजार रोख आणि कागदपत्रांसह तरुणी बेपत्ता

खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील टेंभुर्णा येथून २१ वर्षीय निकीता सहदेव बोराळे ही तरुणी बेपत्ता झाली आहे. १ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास “संडासला जाते” असे सांगून ती घरातून बाहेर पडली, मात्र ती परतली नाही. निकीताने जाताना आपल्यासोबत एक काळ्या रंगाची स्कूल बॅग नेली असून, त्यामध्ये ८० हजार रुपये रोख, आधारकार्ड, शाळेची मूळ कागदपत्रे आणि जांभळ्या रंगाची साडी असल्याचे समजते. सुमन पंडित इंगळे (रा. उमरा पाग्रा, जि. अकोला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट १ इंच, सडपातळ बांधा असून तिने अंगात गुलाबी-पांढरा टॉप, गुलाबी स्टॉल आणि काळ्या रंगाचे सँडल घातलेले आहे. पुढील तपास बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत.

रायपूर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले

रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी शेख साहील शेख राजू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल जावेद अब्दुल तस्लीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आरोपीने त्यांच्या मुलीला पळवून नेले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार आशिष काकडे हे करीत आहेत. सदर वर्णनाच्या मुली कोठेही आढळून आल्यास किंवा या संदर्भात काहीही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!