बुलढाणा,(प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर फिल्मस्टाईलने कृत्य करून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या एका खतरनाक आंतरराज्य टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून या टोळीतील ८ सदस्यांना सिनेमॅटिक पद्धतीने अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्टल, जिवंत काडतुसे, दोन वाहने आणि रोख रकमेसह एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय ३२ वर्षे) हे एका धान्य व्यापाऱ्याकडे काम करतात. २ मे २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास ते आपल्या मालकाचे १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ क्रमांक एमएच-०१-ईजे-३७६८ ने नागपूरहून उंडा (गुजरात) कडे समृद्धी महामार्गावरून जात होते. दुसरबीड टोलनाक्यासमोरील पुलावर गाडीच्या टायरमधील हवा तपासण्यासाठी वाघेला थांबले असता, मागून आलेल्या एका बोलेरो आणि इनोव्हा गाडीने त्यांना अडवले. त्या गाड्यांमधून उतरलेल्या १० ते १२ इसमांनी वाघेला यांना बेदम मारहाण केली आणि डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून ८ लाखांची स्कॉर्पिओ आणि गाडीतील १२ लाखांची रोकड, असा एकूण २० लाखांचा ऐवज जबरीने लुटला आणि वाघेला यांना जालना येथील जंगलात सोडून आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर किनगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दरोडेखोर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात शस्त्रांसह लपून बसले असून ते परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी आपल्या पथकासह तातडीने अंबाजोगाई गाठले. अत्यंत काटेकोर नियोजन करून पोलिसांनी सापळा रचला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पोलिसांनी या आंतरराज्य टोळीतील आरोपी हिम्मतसिंग कुंदनसिंग जुनी (वय २८ वर्षे) रा. अंबाजोगाई (बीड), मुन्ना केशवकुमार वर्मा (वय ३० वर्षे) रा. लखीमपूर खिरी, उत्तर प्रदेश, मनोज सर्जेराव कुटे (वय ३३ वर्षे) रा. साखरे बोरगाव (बीड), मो. रशिद नुरदिन गुज्जर (वय १९ वर्षे) रा. पुछ, (जम्मू काश्मीर), सचिन बुध्दाजी शिर्के (वय ४० वर्षे) रा. माणगाव (रायगड), हरीष तोमर देवळीकर (वय ४४ वर्षे) रा. उडपी (कर्नाटक), अरुणकुमार रामनरेश यादव (वय २८ वर्षे) रा. प्रतापगड (उत्तर प्रदेश), जसपालसिंग केसरसिंग झाला (वय २५ वर्षे) रा. अहमदाबाद (गुजरात) या आठ सराईत गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातून एक लाख ८० हजार रुपये रोख, एक देशी बनावटीची पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे, एक इनोव्हा आणि एक बोलेरो निओ गाडी, चार मोबाईल फोन, २ वायफाय डिव्हाईस आणि नंबर प्लेट्स, असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अवघ्या २४ तासांत या टोळीला गजाआड
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सुनील अंबुलकर, पीएसआय प्रताप बाजड आणि त्यांच्या पथकासह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बंटेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना, बुलढाणा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या टोळीला गजाआड करून सर्वत्र कौतुक मिळवले आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहेत.
