‘चंडोल टोळी’चा गेम ओव्हर! जबरी चोरी आणि दरोड्याने जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या टोळीला धाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘संघटित गुन्हेगारी’ची कलमे लावून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या, धाडसाने दरोडे टाकणाऱ्या आणि भररस्त्यात चाकूला धार लावून लुटमार करणाऱ्या संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात धाड पोलिसांना मोठे यश आले आहे. राजेंद्र सुपडा चंडोल या टोळीप्रमुखासह त्याच्या सक्रिय सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अत्यंत कडक कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, ‘गुन्हेगारांनो सावधान, आता पोलिसांचा दणका सुरू झालाय’, असाच संदेश यातून दिला गेला आहे.

दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली होती. फिर्यादी हे आपल्या दुचाकीने धाडकडे जात असताना, मर्दडी घाटाजवळ ढालसावंगी येथील मोठ्या बोर्डापाशी दबा धरून बसलेल्या या टोळीने आपली गाडी आडवी लावून फिर्यादीला रोखले. काही समजण्याच्या आतच, आरोपींनी चाकुचा धाक दाखवत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर मुद्देमाल हिसकावून पोबारा केला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०९ (४) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाचे चक्र फिरले आणि टोळी उघड झाली!

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश दिले होते. तपासाची सूत्रे हाती घेताच पोउनि परमेश्वर केंद्रे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला सोमीनाथ श्रीराम चंदेल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. ही केवळ एक चोरी नसून, एक संपूर्ण टोळी जालना, छत्रपती संभाजी नगर आणि बुलढाणा जिल्ह्यात संघटितपणे घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.

अटकेतील ‘मोहरे’ आणि त्यांचा पसारा

पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून या टोळीच्या प्रमुखासह सदस्यांना जेरबंद केले. यामध्ये टोळी प्रमुख राजेंद्र सुपडा चंडोल (वय ३५ वर्षे) रा.जनुना (बुलढाणा) सोमनाथ श्रीराम चंदेल (रा.कदीम टाकळी, छत्रपती संभाजी नगर), कृष्णा नारायण मुरडकर (वय ३४ वर्षे) रा. वालसावंगी, जालना) गणेश श्रीकृष्ण पवार (वय ३८ वर्षे) रा. जामठी, (बुलढाणा) यांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये महागडे ३ मोबाईल आणि तीन दुचाकी (पल्सर २२०, एचएफ डिलक्स, युनिकॉर्न) यांचा समावेश आहे.

‘संघटित गुन्हेगारी’ कलमांचा दणका!

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांचा सातत्यपूर्ण वावर लक्षात घेता, या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १११(१), १११(२)(ब), १११(३) आणि १११(४) ही संघटित गुन्हेगारीशी संबंधित कठोर कलमे वाढवण्याचा प्रस्ताव धाड पोलिसांनी उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रस्तावावर कायदेशीर मोहोर उमटवली आणि गुन्हेगारांवर या कडक तरतुदींनुसार कारवाई सुरू झाली.

पोलिसांची ‘टीम वर्क’ फळाला आली!

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, आणि उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि प्रताप भोस, पोउपनि परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण, रविंद्र बराटे, संजय भुजबळ तसेच नितीन इंगळे, अनिल ताम्हणे, आणि इम्रान पठाण यांनी जिवाची पर्वा न करता या गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. सध्या सर्व आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुलढाणा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!