बुलढाणा,(प्रतिनिधी): न्यायदेवतेच्या अंगणात जिथे सर्वसामान्य नागरिक न्यायाच्या आशेने येतात, त्याच बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरात आज दुपारी एका थरारक आणि खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. आपल्याच कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या खटल्यात साक्ष देण्यासाठी मदत केल्याचा राग मनात धरून, एका ६१ वर्षीय नराधमाने आपल्या ३६ वर्षीय साळ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. भरदिवसा आणि भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयीन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आज सोमवार, ४ मे रोजी दुपारी जिल्हा न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारच्या जेवणाची सुटी (लंच ब्रेक) झाल्यामुळे वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि काही न्यायाधीश न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. साधारण दुपारी २.१० वाजेच्या सुमारास, आरोपी विष्णू भगवान तायडे (वय ६१ वर्षे) याने दबा धरून बसल्याप्रमाणे आपला साळा श्रीकृष्ण श्रीरंग तिडके (वय ३६ वर्षे) याच्यावर अचानक झडप घातली. काही कळण्याच्या आतच विष्णूने आपल्याकडे असलेला तीक्ष्ण चाकू श्रीकृष्णच्या पोटात खुपसला.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या श्रीकृष्णचा आक्रोश आणि प्रत्यक्षदर्शींची धावपळ यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी विष्णू तायडेला जागीच झडप घालून ताब्यात घेतले. या घटनेच्या मुळाशी एक अत्यंत वेदनादायी पार्श्वभूमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू तायडे हा अत्यंत क्रूर प्रवृत्तीचा असून त्याच्या जाचाला कंटाळून चार वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने, मुलाने आणि मुलीने सामूहिक विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या विषप्राशन प्रकरणात विष्णूची पत्नी आणि मुलगी बचावली, मात्र त्याच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आपल्याच कुटुंबाला मृत्यूच्या दारात ढकलल्याबद्दल विष्णूवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ रविकुमार के. शर्मा यांच्या न्यायालयात हा खटला अंतिम टप्प्यात आहे. आज याच प्रकरणात विष्णूच्या मुलीची साक्ष नोंदवण्यात आली. आपल्या बहिणीला आणि भाचीला न्याय मिळवून देण्यासाठी श्रीकृष्ण तिडके हा खंबीरपणे उभा होता. आज मुलीने आपल्या वडिलांविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली आणि याचाच टोकाचा राग विष्णूच्या मनात होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू तायडे आज न्यायालयात येतानाच तयारी करून आला होता. त्याने सकाळी १० वाजेपासूनच स्वतःजवळ चाकू लपवून ठेवला होता. “साक्ष दिली तर संपवून टाकीन,” अशी धमकी त्याने यापूर्वीच्या तारखेलाही दिली होती. आज मुलीने साक्ष पूर्ण करताच, बाहेर पडणाऱ्या आपल्या साळ्याला त्याने लक्ष्य केले. एका ज्येष्ठ नागरिकाने अशा प्रकारे हिंसक वळण घेतल्याने उपस्थित वकील वर्गाने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.
वैद्यकीय पथकाची धावपळ
जखमी श्रीकृष्ण तिडके याला तातडीने रक्ताळलेल्या अवस्थेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी स्वतः आपल्या डॉक्टरांच्या पथकासह तातडीने उपचार सुरू केले. श्रीकृष्णच्या पोटात खोलवर जखम झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यावेळी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे ॲड. जयसिंगराजे देशमुख यांनीही रुग्णालयात धाव घेत जखमीच्या प्रकृतीची विचारपूस केली.
न्यायालयीन सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह!
या घटनेने बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. एका आरोपीने सहजपणे चाकू घेऊन न्यायालय परिसरात प्रवेश कसा केला? हा कळीचा मुद्दा आता चर्चिला जात आहे. न्यायालय परिसर सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखादा गुन्हेगार उघडपणे चाकू घेऊन फिरत असेल, तर साक्षीदार आणि वकिलांच्या जीवाला मोठा धोका आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करावी. प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ वकिलांनी केली आहे.
पोलिसांची भूमिका आणि पुढील तपास
बुलढाणा पोलिसांनी आरोपी विष्णू तायडेला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केवळ एका हल्ल्याची नसून, न्यायव्यवस्थेच्या आवारात गुन्हेगारांच्या वाढलेल्या धैर्याचे प्रतीक आहे. आता पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
