बुलढाणा जिल्हा पोलीस डायरी: शेगावात मुलांच्या भांडणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू तर रायपूरमधून तरुणी बेपत्ता

अजय टप

बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मारहाणीच्या घटनांसह विविध अपघातांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेगाव शहरात मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात विटा आणि दगडांनी तुंबळ हाणामारी झाल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, मलकापूर शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर रायपूर येथून एक २३ वर्षीय तरुणी संशयास्पदरित्या बेपत्ता झाली आहे.

शेगावात मुलांच्या भांडणावरून दोन गट भिडले; घरात घुसून दगडफेक व मारहाण

शेगाव: येथील पेठ मोहल्ला भागात काल रात्री मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाले. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांच्या घरात घुसून जबर मारहाण आणि दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. फिर्यादी सय्यद जमीर सय्यद सैलानी यांच्या तक्रारीवरून हनीफ कुरेशी, बीलाल कुरेशी यांच्यासह ८ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांच्या भांडणाचा आणि जुन्या व्यावसायिक तक्रारींचा राग धरून आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोळ्याखाली दुखापत झाली असून त्यांच्या पुतण्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूने शेख मजिद शेख इसाक यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार सय्यद नबाब, सय्यद अफान यांच्यासह १० ते १२ जणांच्या टोळक्याने घरात घुसून त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या भावांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएसआय गजानन गावंडे हे करत आहेत.

झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू 

मलकापूर ग्रामीण: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधलगाव येथे प्रमोद श्रीधर देशमुख (वय ६१ वर्षे) हे आपल्या शेतातील निंबाच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी चढले होते. मात्र, अचानक तोल सुटून खाली पडल्याने त्यांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.महिला पोलिस अंमलदार सविता मोरे या घटनेचा तपास करत आहेत.

निंबवाडी चौकात इसमाचा संशयास्पद मृत्यू

मलकापूर शहर: रणगाव येथील रहिवासी गजानन नारायण गोरे (वय ४० वर्षे) हे मलकापूर शहरातील निंबवाडी चौकात मृत अवस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोउपनि बरदाडे या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत.

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

मलकापूर शहर: उपजिल्हा रुग्णालय आणि मुरज मेडिकल परिसरात एका अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. दोन नागरिकांनी या रुग्णाला मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोउपनि शुभम बरदाडे पुढील तपास करत आहेत.

बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेली रायपूरची तरुणी बेपत्ता

रायपूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक २३ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास “मी एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढून येते” असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी बँक परिसर, बस स्टँड आणि संपूर्ण गावात शोध घेतला, तसेच मात्र पत्ता लागला नाही. शेवटी वडिलांच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी मिसिंगची नोंद केली असून,पुढील तपास पोलीस अंमलदार आशिष काकडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!