मलकापूर धक्कादायक: गुपचुप व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल; कलमांमध्ये वाढ; पीडितेच्या न्यायालयीन जबाबानंतर पोलिसांनी उचलले पाऊल; आरोपी सध्या कोठडीत

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): येथील एका २५ वर्षीय युवतीसोबत गुपचुप व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्सॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल असलेल्या आरोपीविरुद्ध आता ‘भारतीय न्याय संहिते’नुसार बलात्काराचे कडक कलम जोडण्यात आले आहे. पीडितेने न्यायालयासमोर नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ११ जून रोजी या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे.

शहरातील एका २५ वर्षीय युवतीने २९ मे रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपी अविनाश धामोणे याने २९ मार्च २०२६ ते २१ मे २०२६ दरम्यान प्रेमसंबंधातून सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्याने पीडितेच्या संमतीशिवाय या संबंधांचे गुपचुप व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते व्हॉट्सॲपवर प्रसारित करून तिचा विनयभंग व बदनामी केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला आरोपीविरुद्ध अप.नं. ४१३/२०२६ अंतर्गत बीएनएसच्या कलम ७४, ७७ आणि बीएनएसएसच्या कलम ३५६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिते’च्या कलम १८३ अन्वये पीडितेचा न्यायालयात अधिकृत जबाब नोंदवण्यात आला. या जबाबात पीडितेने आरोपीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आरोपी अविनाश याने पीडितेला मलकापूर येथील आपल्या बहिणीच्या घरी बोलावले आणि तिला थंडपेयातून काहीतरी गुंगीकारक पदार्थ मिसळून दिला. ते पेय प्राशन केल्यानंतर पीडितेला ग्लानी आली. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेला बसस्टँडवर बोलावले आणि तेथून भीतीपोटी गेलेल्या पीडितेला त्याने सुरत येथे नेले. पीडितेने न्यायालयासमक्ष नोंदवलेल्या या नव्या आणि गंभीर जबाबाच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी ११ जून रोजी स्टेशन डायरी नोंद क्र. ३१/२०२६ अन्वये गुन्ह्यामध्ये कलम ६४(२)(एम), ३५१(२) या कलमांची वाढ केली आहे.

पोलीस कस्टडीची मागणी

आरोपी अविनाश धामोणे हा ८ जूनपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य आणि गुन्ह्यात वाढलेली नवीन कलमे लक्षात घेता, पुढील सखोल तपासासाठी आरोपीची ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षका गणेश गिरी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!