बुलढाणा जिल्हा क्राईम डायरी: अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद; अल्पवयीन मुलींवर अत्याचार, घातपातासह कोट्यवधींच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, ३२ वर्षांपूर्वीचा मोठा शैक्षणिक घोटाळा आणि अपघातांच्या गंभीर घटनांचा समावेश आहे.
खामगाव शहर: शेगाव नाका परिसरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तिच्याच नातेवाईकाने घरात कोणी नसताना बळजबरने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी रोहित श्याम गायकवाड (वय २८ वर्षे), रा. बाळापूर फैल, खामगाव) याच्याविरुद्ध बीएनएस आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि रिना सदार करत आहेत.
देऊळगाव राजा: मुंबईच्या विलेपार्ले येथून देऊळगाव मही येथे नातेवाईकांकडे आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकाच्या मित्राने जबरदस्तीने अत्याचार केला. विलेपार्ले (मुंबई) पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने नोंद झालेला हा गुन्हा देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आरोपी राकेश (पूर्ण नाव माहीत नाही, वय ३५ ते ४० वर्ष) याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोउपनि राजकुमार मोहोळकर तपास करत आहेत.
खामगाव ग्रामीण: अंत्रज फाटा येथील एक ३५ वर्षीय महिला घरात झोपलेली असताना तिच्या नातेवाईकाने घरात घुसून तिचा विनयभंग केला. महिला जागी झाल्यानंतर तिने आरडाओरड केली असता आरोपीने पळ काढला, तसेच पाठलाग करणाऱ्या तिच्या पतीला शिवीगाळ करत जिवंत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलेश अरुण वानखडे (वय ३६ वर्षे) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगाव: पटवारी कॉलनी (शेगाव) येथे नांदण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय विवाहितेकडे २ लाख रुपये नगद आणि २ तोळे सोन्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली. मागण्या पूर्ण न झाल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पती शुभम मांजरे, सासरे अशोक मांजरे व सासू अनिता मांजरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सपोनी सोनटक्के तपास करत आहेत.
चिखली: येथील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी सन १९९२ पासून अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेजच्या परवानगीसाठी ‘ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’कडे बनावट प्रमाणपत्रे जोडली. ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून शासनाची परवानगी मिळवली व कोट्यवधींचा निधी लाटल्याचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पडताळणी अहवालात निष्पन्न झाले आहे. विस्तार अधिकारी नितीन विजय शेळके यांच्या तक्रारीवरून संस्थेच्या विश्वस्तांवर फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर शहर: नॅशनल हायवे क्रमांक ५३ बेलाड फाटा येथे एका भरधाव किया कार क्रमांक जी जे ३७ जे ९४७८ ने लुना गाडी (क्रमांक एमएच-२८-एव्ही-२४३८) ला जोरदार धडक दिली. या अपघातात ५८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय निंबोळकर हे करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: रणगाव ते शिवनी रोडवर बकऱ्या चारून पायी घरी येणाऱ्या ४६ वर्षीय महिलेला एका भरधाव ट्रॅक्टर चालकाने (सोपान बावस्कर) विरुद्ध दिशेने येवून जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या छातीच्या तीन बरगड्या मोडल्या असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मलकापूर: लिहा बुद्रुक (ता. मोताळा) येथील २३ वर्षीय तरुण उमेश ईश्वर सुशीर याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केले होते. उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून शहर पोलीस ठाण्यात मर्ग नोंदवण्यात आला आहे.
शेगाव: गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी पेठ मोहल्ला येथे छापा टाकून एका ३ वर्षाच्या गोऱ्याला (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) कत्तलीच्या उद्देशाने, चारा-पाण्याची व्यवस्था न करता अतिशय निर्दयतेने डांबून ठेवल्याचे उघडकीस आणले. आरोपी शेख हनीफ शेख खाजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी चौक येथे पोलिसांनी एका टाटा एसी मालवाहू वाहनात दोन बैल (किंमत ८० हजार रुपये) अतिशय आखूड दोरीने डांबून, कत्तलीसाठी घेऊन जाताना दोन आरोपींना रंगेहात पकडले. आरोपी शेख सलीम आणि शेख अफसर (रा.बावणबीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाळा: रोहीन खिडकी (ता. संग्रामपूर) येथील एक महिला आपल्या ७ वर्षांच्या मुलाला आणि १८ महिन्यांच्या चिमुरडीला सोबत घेऊन कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे. पोहवा शाकीर पटेल या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मलकापूर शहर: राधाकिसन सोसायटी येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे क्लासेसला जाते असे सांगून घरून निघून गेली, मात्र ती परत आली नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली आहे. पोलीस अंमलदार रवींद्र दळवी तपास करत आहेत.
मलकापूर: संताजी नगर (मलकापूर) येथील ५० वर्षीय गणेश हरीभाऊ नारखेडे हे जळगाव येथे कामासाठी जात असल्याचे सांगून गेल्यापासून बेपत्ता आहेत. तसेच धामणगाव बढे येथून २४ वर्षीय विवाहिता आणि किंगाव राजा येथील निमखेड येथून २० वर्षीय विवाहित महिला घरातून निघून गेल्या असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!