शेगावात ७० लाखांचा गुटखा जप्त, पण ‘अन्न व औषध प्रशासन’ अजूनही गांधींच्या भूमिकेत!

अजय टप

खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पोलीस प्रशासनाने शेगावात तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त करून गुटखा माफियांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांची ही धडक कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरत असली, तरी दुसरीकडे या संपूर्ण काळ्या धंद्यावर वचक ठेवण्याची मुख्य जबाबदारी असलेले ‘अन्न व औषध प्रशासन’ मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून अजूनही सुस्त, म्हणजेच ‘गांधींच्या भूमिकेत’ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस पथक पेट्रोलींग करत होते. बऱ्हाणपूर-वरवट बकालकडून अकोला-यवतमाळकडे एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या एमएच-४०-जीटी-२९६५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून मानवी आरोग्यास अपायकारक आणि प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने खामगाव कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुनील राऊत, पोलीस अंमलदार सुधाकर थोरात, योगेश कुंवारे आणि मंगेश सोळंके यांच्या पथकाने शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवट बकाल ते शेगाव रोडवर यादव बेकरीसमोर १३ जूनच्या रात्री १० वाजता नाकाबंदी केली. सदर संशयित वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवले. ट्रक चालकाला ताब्यात घेऊन नाव-गाव विचारले असता, त्याने आपले नाव सुरुर अहमद नुर अहमद (वय ३७ वर्षे), रा. अल्लाह मस्जिद जवळ, फिरदोस कॉलनी, अकोला असल्याचे सांगितले. गाडीत काय माल आहे?, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरे देण्यास सुरुवात केली. संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पोती ठासून भरलेली आढळली. पोत्यांमध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला बाजीराव गोल्ड इम्पेरिअल पानमसाल्याचे ५० पोते (किंमत १२ लाख ४८ रुपये), मस्तानी तंबाखू ११ पोते (किंमत २ लाख २८ हजार ८०० रुपये), नजर १००० पानमसाला व एन-०५ प्रीमियम चेविंग टोबॅको ४ पोते (किंमत १ लाख ९० हजार ८० रुपये), नजर १००० पानमसाला व एन-०५ प्रीमियम चेविंग टोबॅको ४६ पोते (किंमत १९ लाख ४३ हजार ४० रुपये), प्रीमियम नजर ९००० एकूण ६ थैल्यांचे पोते (किंमत १४ लाख ४ हजार रुपये), असा एकूण ५० लाख १३ हजार ९२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि २० लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड वाहन, असा एकूण ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून वाहन डिटेन करण्यात आले आहे.

…तर मग ‘अन्न व औषध प्रशासन’ काय झोपतंय?

पोलिसांनी तर आपली जबाबदारी चोख पार पाडली, मात्र या कारवाईने अन्न व औषध प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे धिंडवडे काढले आहेत. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर, लाखोंच्या संख्येने गुटख्याची पोती राजरोसपणे वाहतूक केली जातातच कशी?, पोलिसांना गुप्त बातमीदार माहिती देतात, मग एफडीएचे ‘कमिशनर’ आणि त्यांचे पथक नेमके कुठे झोपा काढत असते? एफडीएचे अधिकारी ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’, अशा गांधींच्या भूमिकेत का वावरत आहेतत?, असा तिखट सवाल आता उपस्थित होत आहे. गुटखा माफियांकडून मिळणाऱ्या मलिद्यामुळेच एफडीएने डोळ्यांवर कातडे तर ओढले नाही? असा संशय याकरवाईमुळे बळावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!