मलकापूर: लोणवडीच्या ३४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपासाला वेग

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील एका ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह नरवेल येथे संशयास्पद रित्या आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अमोल संजय पाटील असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नरवेल येथील एका खासगी प्लांटजवळ (आर.ओ.प्लांट परिसर) एक तरुण मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली. नागरिकांनी तातडीने याची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईक प्रकाश सोपान पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोलला तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.पी.फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षसेविका तस्लीम शेख यांनी या घटनेचा लेखी मेमो मलकापूर शहर पोलीस स्टेशनला सादर केला. या मेमोच्या आधारे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. अमोलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह नरवेल येथील एका प्लांटजवळ आढळून आला आहे. तरुणाचा मृत्यू नैसर्गिक आहे, की यामागे काही घातपात आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळासे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!