अजय टप
शेगाव/खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. शेगावात शेतकऱ्याचा पाण्याचा पंप लांबवला, तर खामगावात चोरट्यांनी चक्क पांढऱ्या रंगाच्या ‘अर्टिगा’ कारमधून येत २० पैकी ७ बकऱ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेगावात शेतकऱ्याचा ४० हजारांचा पंप लंपास
पहिली घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सवर्णा शिवारात घडली. फिर्यादी संजय महादेव डेरे (वय ५२ वर्षे) रा.मंगलम नगर (शेगाव) यांची सवर्णा शिवारात गट नंबर १५४ मध्ये शेती आहे. २ मे च्या सायंकाळी ५.३० ते ३ मे च्या सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश केला. विहिरीतील ५ एचपी क्षमतेचा सबमर्सिबल मोटार पंप, त्यासोबत असलेला २०० फूट रोलिंग पाईप आणि २०० फूट केबल असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. संजय डेरे सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार मुबीन शाहा हे करत आहेत.
अर्टिगा कारमधून आले अन् ७ बकऱ्या चोरून नेल्या!
खामगाव ग्रामीण: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंप्री देशमुख येथे घडली. येथील रहिवासी महादेव संतोष दांडगे (वय ४२ वर्षे) हे शेतीसोबतच शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे लहान-मोठ्या एकूण २० बकऱ्या आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी ३ मे च्या रात्री आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत ताट्यांच्या कुंपणात बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. ४ मे च्या पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास महादेव दांडगे यांच्या आईला जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांना गोठ्यातील बकऱ्या कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने महादेव यांना आवाज दिला. मोजदाद केली असता, २० पैकी ७ मोठ्या बकऱ्या गायब होत्या.
या घटनेबाबत परिसरात चौकशी केली असता, शेजारी राहणारे भैयाभाऊ अंमलकार हे रात्री बाहेरगावावरून परत येत असताना, पहाटे ३ वाजेच्या सुमारास दांडगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार उभी असल्याचे त्यांनी पाहिले होते. यावरून, चोरट्यांनी आलिशान कारचा वापर करून ५६ हजार रुपये किमतीच्या ७ बकऱ्या गाडीत कोंबून चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार किरण हे करीत आहेत.
शेतकऱ्यांनो सावधान!
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. महागड्या कारचा वापर करून पशुधनाची चोरी होत असल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
