अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत महिला आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. सोनाळा, बिबी आणि मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या तक्रारी दाखल झाल्या असून, यात एका २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीसह दोन विवाहित महिलांचा समावेश आहे. घरगुती वाद आणि रात्रीच्या सुमारास अचानक गायब होण्याच्या या प्रकारांमुळे जिल्हाभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
सोनाळा येथून २१ वर्षीय उच्चशिक्षित नेहा राऊत बेपत्ता
सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील उच्चशिक्षित तरुणी नेहा संतोष राऊत (वय २१ वर्ष) ही ३ मे च्या मध्यरात्री घरातून गूढरीत्या बेपत्ता झाली आहे. अर्जदार गोपाळ रामकृष्ण राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सर्व कुटुंबीय झोपलेले असताना आणि पुरुष मंडळी शेतात पाणी देण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास नेहाची आजी जागी झाली असता घराचा दरवाजा उघडा दिसला. तपास केला असता नेहा घरात नसल्याचे समोर आले. गोरा रंग, ५ फूट उंची आणि गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली नेहा अद्याप मिळून आलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रमेश खरात करत आहेत.
बिबी येथे २३ वर्षीय विवाहिता गायब; परिसरात तर्कवितर्क
दुसरी घटना लोणार तालुक्यातील बिबी येथे घडली आहे. प्रियंका अनिल मान्टे (वय २३ वर्ष) ही विवाहिता ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. पती अनिल सुभाष मान्टे यांनी बिबी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. प्रियंकाने अंगात पिवळसर रंगाचा टॉप, काळी लेगीज आणि तोंडाला स्कार्फ बांधलेला होता, तसेच तिच्या पाठीवर बॅग असल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रविराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
घरगुती वादातून मलकापूरची विवाहिता बेपत्ता
मलकापूर शहरात घरगुती वादाचे पर्यवसान एका विवाहितेच्या बेपत्ता होण्यात झाले आहे. शारदा संजय चांदणे (वय ३३ वर्ष, रा. कुंड खुर्द) या ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रागात घर सोडून निघून गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नणंद आणि मोठ्या बहिणीच्या वादावरून पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. पती कामावर गेल्यानंतर शारदा या मलकापूरला जातो असे सांगून निघून गेल्या, त्या अद्याप परतलेल्या नाहीत. सावळा रंग आणि जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या शारदा यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीस अंमलदार सचिन पाटील यांच्यासमोर आहे. एकाच दिवसात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून तीन महिला बेपत्ता झाल्यामुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या तिन्ही घटनांमधील साम्य म्हणजे महिलांनी कोणालाही कल्पना न देता घर सोडले आहे. जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या बेपत्ता प्रकरणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास युद्धपातळीवर करून या महिलांना सुरक्षित घरी परत आणणे गरजेचे आहे.
