अजय टप
मलकापूर, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो):शहरातील हजीअली नगर परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची आणि मदतीला धावून आलेल्या तिच्या निष्पाप मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपींनी केवळ महिलेची छेड काढली नाही, तर मध्यस्थी करणाऱ्या सासूला धक्काबुक्की करत पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील हजीअली नगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय पीडिता या ५ मे रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या घरी होत्या. यावेळी आरोपी शेख सादीक शेख रहीस हा वाईट उद्देशाने त्यांच्या घरात शिरला. त्याने पीडिताचे हात पकडून त्यांना स्वतःकडे ओढले आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केली असता, तिचा लहान मुलगा आईच्या मदतीला धावून आला. मात्र, क्रूरतेचा कळस गाठत आरोपी सादीकने दारापाशी असलेली वीट उचलून चिमुरड्याच्या कपाळावर जोरात मारली. या भीषण हल्ल्यात मुलाचे डोके फुटून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
कुटुंबियांनाही दिली अमानुष वागणूक
महिलेचा आणि मुलाचा आवाज ऐकून त्यांची सासू बचावासाठी आली असता, आरोपीने त्यांनाही लोटपाट करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. घाबरलेल्या पीडितेने तात्काळ आपल्या पतीला फोन करून बोलावून घेतले. पती घरी आल्यावर ते आरोपी सादीकला जाब विचारत असतानाच, आरोपी शेख शाहरुख शेख रहीस, शेख आरिफा शेख रहीस आणि शेख रहीस शेख शब्बीर हे सर्व तिथे पोहोचले. या टोळक्याने पीडितेच्या पतीला घेराव घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि परिसरात दहशत माजवली. आज मुलाला वीट मारली आहे, पुढच्या वेळी तुम्हा सर्वांना जिवंत मारून टाकू!, अशा शब्दांत आरोपींनी भररस्त्यात धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी नागेश मोहोळ हे करीत आहेत.
आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी
एका बाजूला प्रशासन महिला सुरक्षेच्या गप्पा मारत असताना, भरवस्तीत घरात घुसून अशा प्रकारे विनयभंग आणि बालकावर हल्ला होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. आरोपींची गुंडगिरी एवढी वाढली आहे की त्यांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, असे या घटनेवरून स्पष्ट होते. तपास अधिकारी सपोनी नागेश मोहोळ या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी हजीअली नगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
